वादग्रस्त कोथमिरेंची गडचिरोलीत 'आमद' नाही; वरिष्ठ पातळीवर कारवाईसाठी चर्चा 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2021 07:22 PM2021-05-15T19:22:30+5:302021-05-15T19:23:57+5:30

Police Officer Rajkumar Kothmire Transfer : मायानगरी मुंबईत रमलेले,  तेथील नाईट लाइफची सवय जडलेले पोलीस अधिकारी मुंबई बाहेर बदली झाली की नाकतोंड मुरडतात.

Controversial Police Officer kothmire has no 'arrival' in Gadchiroli; Discussions for action at the senior level | वादग्रस्त कोथमिरेंची गडचिरोलीत 'आमद' नाही; वरिष्ठ पातळीवर कारवाईसाठी चर्चा 

वादग्रस्त कोथमिरेंची गडचिरोलीत 'आमद' नाही; वरिष्ठ पातळीवर कारवाईसाठी चर्चा 

Next
ठळक मुद्देआज शनिवारी नऊ दिवस होऊनही कोथमिरे यांनी गडचिरोलीला आमद (रुजू होणे) दिलेली नाही.

नरेश डोंगरे

नागपूर : खंडणीच्या आरोपामुळे वादाच्या भोवऱ्यात अडकलेले वादग्रस्त पोलीस अधिकारी राजकुमार कोथमिरे यांची बदली होऊन नऊ दिवस झाले. मात्र, त्यांनी अद्याप गडचिरोलीत 'आमद' दिलेली नाही. त्यामुळे पोलिस दलात उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.
 मायानगरी मुंबईत रमलेले,  तेथील नाईट लाइफची सवय जडलेले पोलीस अधिकारी मुंबई बाहेर बदली झाली की नाकतोंड मुरडतात. त्यातल्या त्यात गडचिरोली, गोंदियाच्या नावाने अनेकांना शहारे येतात. त्यांच्या नावे भले कितीही एनकाउंटर असो, नक्षलग्रस्त गडचिरोली-गोंदियात बदली झाली की अनेकांना धडकी भरते. ते तिकडे जाण्याऐवजी 'मॅट, सिक लिव्ह'चा पर्याय निवडतात. एनकाऊंटर स्पेशालिस्ट दया नायक असो की वादग्रस्त सचिन वाझे हे दोघेही गडचिरोली-गोंदिया रेंजमध्ये बदली झाल्यानंतर इकडे रुजूच झाले नाही.

२०१४ नंतर दया नायक यांची पुन्हा मे २०२१ मध्ये गोंदियाला बदली झाली. मात्र त्यांनी 'मॅट'मध्ये धाव घेऊन या बदलीवर स्थगिती मिळवली. याच दरम्यान, मुंबईतील बिल्डर मयुरेश राऊत याला खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देऊन मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबिर सिंग तसेच त्यांचे तेव्हाचे खासमखास समजले जाणारे प्रदीप शर्मा (माजी पोलीस अधिकारी) आणि पोलीस निरीक्षक राजकुमार कोथमिरे यांनी कोट्यवधीची खंडणी उकळल्याची तक्रार झालेली आहे.

या प्रकरणाची चौकशी सीआयडी करीत आहे. या पार्श्वभूमीवर, कोथमिरे यांची पोलीस महानिरीक्षक गडचिरोली यांचे वाचक म्हणून बदली करण्यात आल्याचा आदेश ६ मे रोजी काढण्यात आला. बदली झालेले ठिकाण एक हजार किलोमीटरच्या आतमध्ये असेल तर संबंधित अधिकाऱ्याला तेथे रुजू होण्यासाठी सात दिवसांचा अवधी दिला जातो. मात्र आज शनिवारी नऊ दिवस होऊनही कोथमिरे यांनी गडचिरोलीला आमद (रुजू होणे) दिलेली नाही. दरम्यान, नमूद कालावधी संपूनही ते गडचिरोलीत रुजू न झाल्यामुळे त्यांच्याविरुद्ध कोणती कारवाई केली जाते, त्याकडे संपूर्ण पोलिस दलाचे लक्ष लागले आहे.
 

'ऑडिओ क्लीप'मुळे अडचण
विशेष म्हणजे, कोथमिरे यांच्या विरोधात तक्रार करणाऱ्या बिल्डरने पुरावा म्हणून कोथमिरे आणि मयुरेश राऊत यांच्या पत्नीत फोनवर झालेल्या संभाषणाच्या क्लीप दिल्या आहेत. त्या तीन क्लीप व्हायरल झाल्याने कोथमिरेंच्या अडचणी वाढल्या आहेत.

तर कारवाईबाबत चर्चा : डीआयजी पाटील
 कोथमिरे अजून रुजू झाले नाही.  ठोस कारणही कळले नाही, त्यामुळे त्यांच्यावर कारवाई होणार का, अशी विचारणा गडचिरोली-गोंदिया रेंजचे डीआयजी संदीप पाटील यांच्याकडे केली असता 'सोमवार पर्यंत वाट बघू. नंतर वरिष्ठांशी चर्चा करून कारवाई बाबत निर्णय घेतला जाईल', असे डीआयजी पाटील यांनी 'लोकमत'ला सांगितले.

Web Title: Controversial Police Officer kothmire has no 'arrival' in Gadchiroli; Discussions for action at the senior level

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app