ग्राहक न्यायालयाच्या लाचखाेर लिपिकास एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा; ठाण्यातील प्रकरण
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2025 23:11 IST2025-09-30T23:10:56+5:302025-09-30T23:11:45+5:30
ठाणे न्यायालयाचा आदेश; तक्रारदार वकीलाच्या मृत्यूनंतर झाली सुनावणी

ग्राहक न्यायालयाच्या लाचखाेर लिपिकास एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा; ठाण्यातील प्रकरण
जितेंद्र कालेकर, लाेकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: तक्रार अर्ज दाखल करण्यासाठी एक हजारांची लाच घेणाऱ्या किशाेर मानकामे या लिपीकाला ठाणे न्यायालयाने एक वर्ष सश्रम कारावासाची तसेच एक हजारांच्या दंडाची शिक्षा सुनावली आहे. दंड न भरल्यास एक महिन्याच्या साध्या कारावासाची शिक्षाही आराेपीला मंगळवारी सुनावण्यात आली.
तक्रारदार वकील कनकसिंह बाेडा (६८, रा. भाईंदर, ठाणे ) यांना ठाण्याच्या ग्राहक न्यायालयात एक केस दाखल करायची हाेती. त्यासाठी त्यांनी ७ डिसेंबर २०१७ राेजी त्यांची कनिष्ठ वकील प्रिती गाेस्वामी यांना ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयातील ग्राहक न्यायालयात पाठविले हाेते. त्यावेळी मानकामे या लिपिकाने संबंधित केसची फाईल ठेवून घेत बाेडा यांना यायला सांगितले हाेते. त्याप्रमाणे ॲड. बाेडा हे त्याच दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयातील ग्राहक न्यायालयात मानकामे यांना भेटले. तेव्हा मानकामे यांनी त्यांना पाच फाईलींचे दाेनशे रुपयांप्रमाणे एक हजारांच्या लाचेची मागणी केली. याच प्रकरणी तक्रारीनंतर ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक वाल्मीक पाटील यांच्या पथकाने १४ डिसेंबर २०१७ राेजी सापळा रचून कारवाई केली. त्यावेळी मानकामे याला एक हजारांची लाच स्वीकारतांना रंगेहाथ अटक करण्यात आली.
या खटल्याची सुनावणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे विशेष न्यायाधीश सूर्यकांत शिंदे यांच्या न्यायालयात ३० सप्टेंबर २०२५ राेजी सुनावणी झाली. सरकारी वकील संजय माेरे यांनी यामध्ये पाच साक्षीदार तपासले. यातील फिर्यादी वकील बाेडा यांचे निधन झाल्याने केस सिद्ध करण्याचे माेठे आव्हान सरकारी पक्षासमाेर हाेते. ॲड. माेरे यांनी जाेरदार युक्तीवाद करुन सरकारी पक्षाची बाजू भक्कमपणे मांडली. सर्व बाजू पडताळणीनंतर न्यायालयाने आराेपीला लिपीकाला एक वर्षाच्या कारावासाची शिक्षा सुनावली.