धक्कादायक! काँग्रेस आमदाराच्या मुलाने स्वतःवर गोळी झाडून केली आत्महत्या, घटनेने खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2021 09:00 IST2021-11-12T08:53:38+5:302021-11-12T09:00:53+5:30
Congress MLA Sanjay Yadav Son Vibhu Commits Suicide : काँग्रेस आमदाराच्या मुलाने टोकाचं पाऊल उचललं असून आत्महत्या करून जीवन संपवलं आहे.

धक्कादायक! काँग्रेस आमदाराच्या मुलाने स्वतःवर गोळी झाडून केली आत्महत्या, घटनेने खळबळ
नवी दिल्ली - मध्य प्रदेशच्या जबलपूरमध्ये एक भयंकर घटना घडली आहे. काँग्रेस आमदाराच्या मुलाने टोकाचं पाऊल उचललं असून आत्महत्या करून जीवन संपवलं आहे. धक्कादायक बाब म्हणजे स्वतःवर गोळ्या झाडून मुलाने आत्महत्या केली आहे. घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. काँग्रेसचे आमदार संजय यादव (Congress MLA Sanjay Yadav) यांच्या अल्पवयीन मुलाने स्वतःवर गोळी झाडली. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या मुलाला तातडीने रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं. मिळालेल्या माहितीनुसार, राहत्या घरामध्ये मुलाने स्वतःवर गोळी झाडली. रुग्णालयामध्ये दाखल केलं गेलं तेव्हा त्याची प्रकृती चिंताजनक होती. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बरगी विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे आमदार संजय यादव यांचं हाथी ताल कॉलनीमध्ये घर आहे. त्यांच्या घरात दुपारी अचानक गोळीबाराचा आवाज आला. घरातील सदस्यांनी धाव घेतली तर आमदारांचा मुलगा विभु यादव हा आपल्या खोलीत रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. त्याने स्वत:वर गोळी झाडून घेतली होती. 16 वर्षांच्या मुलगा विभू यादव याच्या डोक्याला गोळी लागली होती. यानंतर कुटुंबातील सदस्यांनी त्याला तातडीने जवळच्या रुग्णालयामध्ये नेलं. विभू यादवची प्रकृती चिंताजनक असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं होतं.
पोलिसांकडून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू
धक्कादायक घटनेची माहिती मिळताच शहरातील काँग्रेस नेते रुग्णालयामध्ये आले. पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. मात्र पोलिसांनी अधिक माहिती देण्यास नकार दिला आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विभुने घरामध्ये असलेल्या बंदुकीतून गोळी झाडली आहे. घटनास्थळी एक सुसाईड नोट देखील सापडली आहे. पण त्यामध्ये नेमकं काय लिहिलं आहे याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. रुग्णालयाच्या बाहेर सध्या पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.