"तडजोड कर नाहीतर तुझीच बदनामी होईल"; छेडछाड करणाऱ्यालाच पीडितेच्या घरी घेऊन गेले पोलीस!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2025 20:10 IST2025-10-08T20:10:04+5:302025-10-08T20:10:55+5:30
UP Crime: उत्तर प्रदेशातील कानपूर शहरात पोलिसांच्या अत्यंत लाजिरवाण्या आणि संतापजनक कारभाराचे उदाहरण समोर आले आहे. एका तरुणीची छेडछाड ...

"तडजोड कर नाहीतर तुझीच बदनामी होईल"; छेडछाड करणाऱ्यालाच पीडितेच्या घरी घेऊन गेले पोलीस!
UP Crime:उत्तर प्रदेशातील कानपूर शहरात पोलिसांच्या अत्यंत लाजिरवाण्या आणि संतापजनक कारभाराचे उदाहरण समोर आले आहे. एका तरुणीची छेडछाड करणाऱ्या आरोपीला अटक केल्यानंतर विचित्र प्रकार घडला. पोलीस अधिकाऱ्याने पीडितेला न्याय देण्याऐवजी तो आरोपीला घेऊन थेट पीडितेच्या घरी तडजोड करण्यासाठी घेऊन गेला. प्रकरण मिटवून टाक नाहीतर तुझीच समाजात बदनामी होईल असाही धक्कादायक सल्ला त्या पोलीस अधिकाऱ्याने दिला. हा सगळा प्रकार समोर आल्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कठोर कारवाईचे आश्वासन दिलं आहे.
कानपूर येथील एका तरुणीची छेडछाड झाली होती. तरुणीने आणि तिच्या कुटुंबीयांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपीला अटकही केली. मात्र, पुढील तपास आणि कायदेशीर कारवाई करण्याऐवजी बिठूर पोलीस स्टेशनच्या एका पोलीस उपनिरीक्षकाने अत्यंत गंभीर प्रकार केला. या पोलीस अधिकाऱ्याने तक्रारीची गांभीर्याने नोंद न घेता, छेडछाड करणाऱ्या तरुणाला सोबत घेतले आणि त्याला घेऊन पीडित मुलीच्या घरी पोहोचला.
पीडितेच्या घरी पोहोचल्यावर, पोलीस अधिकाऱ्याने कुटुंबीयांवर दबाव आणण्यास सुरुवात केली.'हा लहान मुलगा आहे, त्याचे करिअर खराब होईल. तुम्ही प्रकरण इथेच मिटवून टाका (तडजोड करा)', असे सांगत त्याने पीडितेच्या कुटुंबीयांना तक्रार मागे घेण्यासाठी धमकावले. पोलिसांनीच आरोपीची बाजू घेतल्यामुळे पीडितेच्या कुटुंबीयांना प्रचंड मोठा मानसिक त्रास सहन करावा लागला.
आरोपीचे नाव देवेंद्र प्रजापती आहे. त्याच्यावर आधीच अनेक गुन्हे दाखल आहेत. कथित "मांडवाली" घडवणारा निरीक्षक अभिषेक कुमार शुक्ला आहे. देवेंद्र प्रजापती कोचिंग क्लासला जात असताना पीडितेला वारंवार त्रास देत असे. काही दिवसांपूर्वी, आरोपीने तरुणीला आपल्या गाडीत ओढून नेले आणि तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. त्या दिवशी ती पळून जाण्यात यशस्वी झाली, पण जर तिने या घटनेबद्दल कोणाला सांगितले तर तिच्यावर अॅसिड ओतून जीवे मारण्याची धमकी त्याने दिली होती.
जेव्हा ही बातमी वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचली आणि सोशल मीडियावर या घटनेची जोरदार टीका झाली, तेव्हा तातडीने कारवाई करण्यात आली. छेडछाडीच्या आरोपीला घेऊन पीडितेच्या घरी गेलेल्या त्या उपनिरीक्षकाला तात्काळ निलंबित करण्यात आले आहे आणि या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.