बापरे! कॉम्प्रेसर प्रेशरचा पाईप तरुणाच्या गुदव्दारात घुसवला; पोटात हवा भरल्याने तरुणाचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2021 21:29 IST2021-12-02T21:26:17+5:302021-12-02T21:29:16+5:30
Death Case : मुन्ना व बिट्टूकुमार असे अटक केलेल्या कामगारांची नावे आहेत. तर अब्दुल रफिक मन्सुरी ( वय ३२) असे पोटात हवा शिरल्याने मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.

बापरे! कॉम्प्रेसर प्रेशरचा पाईप तरुणाच्या गुदव्दारात घुसवला; पोटात हवा भरल्याने तरुणाचा मृत्यू
भिवंडी - वाहनांच्या टायरमध्ये हवा भरणाऱ्या कॉम्प्रेसर प्रेशर मशीनचा पाईप तरुणाच्या गुदव्दारात घुसवून पोटात हवा भरल्याने तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना शहरातील सिल्क मिल्स लूम कारखान्यात घडली आहे. याप्रकरणी निजामपूर पोलीस ठाण्यात मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या दोघा कामगारांवर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.
मुन्ना व बिट्टूकुमार असे अटक केलेल्या कामगारांची नावे आहेत. तर अब्दुल रफिक मन्सुरी ( वय ३२) असे पोटात हवा शिरल्याने मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. मयत अब्दुल हा भिवंडीतील खाडीपार भागातील एका चाळीत राहून तो त्याच भागात असलेल्या सिल्क मिल्स लूम कारखान्यात लूमकामगार म्हणून कार्यरत होता. तर दोन्ही आरोपीही याच लूम कारखान्यात लूमकामगार म्हणून कार्यरत आहेत. २६ नोव्हेंबर २०२१ रोजी रात्री ८ वाजल्याच्या सुमारास मृतक व आरोपींची कारखान्यात मजाक मस्करी सुरु होती. त्यातूनच दोघा आरोपीने कारखान्यात असलेल्या टायरमध्ये हवा भरणाऱ्या कॉम्प्रेसर प्रेशर मशीनचा पाईप अब्दुलच्या गुदव्दारात घुसवून मशीन सुरु केली. त्यावेळी गुदव्दारावाटे हवा जोरात पोटात जाऊन आतड्याना गंभीर दुखापत झाली होती. यात अब्दूलला त्रास झाल्याने त्याला भिवंडीतील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र उपचार सुरु असतानाच बुधवारी त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी मृतकाच्या नातेवाईक शबोउद्दीन मन्सुरी यांच्या तक्रारीवरून निजामपूर पोलीस ठाण्यात दोन्ही आरोपीविरोधात भादवी. कलम ३०४, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करून दोघांना अटक केली आहे. गुरुवारी अटक आरोपींना न्यायालयात हजर केले असता दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.