नाशिक: महिला मनसे पदाधिकाऱ्याची भाईगिरी; बांधकाम व्यवसायिकाला शिविगाळ करत मारहाण, व्हिडिओ व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2022 14:29 IST2022-01-12T14:25:47+5:302022-01-12T14:29:45+5:30
एका बांधकाम व्यवसायिकाला मनसेच्या महिला पदाधिकाऱ्याने शिवीगाळ करत मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे.

नाशिक: महिला मनसे पदाधिकाऱ्याची भाईगिरी; बांधकाम व्यवसायिकाला शिविगाळ करत मारहाण, व्हिडिओ व्हायरल
नाशिक:नाशिकमध्ये एका बांधकाम व्यावसायिकाला मनसे पदाधिकारी असलेल्या महिलेकडून मारहाण करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणाची धूळ उडत असल्याच्या किरकोळ कारणावरून बांधकाम व्यवसायिक आणि मनसेच्या महिला पदाधिकारी यांच्या कुटुंबीयांमध्ये वाद झाला आणि या वादानंतर मनसेच्या महिला पदाधिकारीने शिवराळ भाषेत शिव्या देत बांधकाम व्यसायिकाला मारहाण केली या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नाशिकच्या पंचवटी परिसरात एका बांधकाम व्यवसायिकाला मनसेच्या महिला पदाधिकाऱ्याने शिवीगाळ करत मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. जयेश काठे असे या बांधकाम व्यवसायिकाचे नाव असून, त्यांच्या तक्रारीवरून मनसेच्या पंचवटी विभाग अध्यक्ष अक्षरा घोडके विरोधात पंचवटी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. दरम्यान या मारहाणीच्या घटनेचा व्हिडीओ देखील समोर आला आहे. अतिशय अर्वाच्च भाषेत मनसेच्या पदाधिकारी अक्षरा घोडके यांनी बांधकाम व्यवसायिकाला शिवीगाळ करत मारहाण केल्याचे यात पाहायला मिळत आहे.
बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणची धूळ उडाली, या किरकोळ कारणाहून मनसेच्या महिला पदाधिकाऱ्याने आपल्याला मारहाण केली असून, पोलीस आणि मनसेच्या वरिष्ठांनी या महिलेवर कारवाई करावी, अशी मागणी या बांधकाम व्यवसायिकाने केली आहे. तर या प्रकरणात ज्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे, त्या मनसेच्या पदाधिकारी अक्षरा घोडके यांनीही संबंधित बांधकाम व्यवसायिकाने आपल्याला धक्काबुक्की आणि शिवीगाळ केल्याचा आरोप केला आहे.