समंतीशिवाय सहखातेदार अन् ३७ लाख रुपये लंपास, अनिवासी भारतीयाला घातला गंडा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2025 06:35 IST2025-01-12T06:25:44+5:302025-01-12T06:35:59+5:30
अमेरिकेत राहणाऱ्या या व्यक्तीने याप्रकरणी सीबीआयकडे तक्रार केली होती. त्यानुसार त्याने १९८७ साली बँक ऑफ बडोदाच्या इंदूर येथील शाखेत खाते सुरू केले होते.

समंतीशिवाय सहखातेदार अन् ३७ लाख रुपये लंपास, अनिवासी भारतीयाला घातला गंडा
मुंबई : अमेरिकेतील कॅलिफोर्नियात वास्तव्यास असलेल्या एका अनिवासी भारतीयाच्या बँक खात्यात त्याच्या संमतीशिवाय परस्पर एका व्यक्तीचे नाव सहखातेदार म्हणून जोडले. त्यानंतर त्याच्या खात्यातून ३७ लाख ५९ हजार रुपये लंपास केले. या प्रकरणाचा तपास आता सीबीआयने सुरू केला आहे.
अमेरिकेत राहणाऱ्या या व्यक्तीने याप्रकरणी सीबीआयकडे तक्रार केली होती. त्यानुसार त्याने १९८७ साली बँक ऑफ बडोदाच्या इंदूर येथील शाखेत खाते सुरू केले होते. २०१९ पर्यंत या खात्यामध्ये नियमितपणे पैसे भरले आणि काढले जात होते. मात्र, २०२० ते २०२३ या कालावधीमध्ये खात्यामध्ये केवळ पैसे भरले जात होते.
८ ऑगस्ट २०२३ रोजी त्याच्या खात्यामध्ये मुंबईच्या काळबादेवी येथील एका रहिवाशाचे नाव सहखातेदार म्हणून जोडले गेले. याची कोणतीही माहिती तक्रारदाराला नव्हती. त्यानंतर हे खाते इंदूर येथून मुंबईच्या झवेरी बाजार शाखेत वळवले गेले. त्यानंतर काही कालावधीने पुन्हा हे खाते बदलापूर मग नंदनवन त्यानंतर नागपूर येथील शाखेत वळवण्यात आले. नंदनवन येथील शाखेतून ऑगस्ट २०२३ ते फेब्रुवारी २०२४ या कालावधीमध्ये या खात्यातून धनादेशाद्वारे ३७ लाख ५० हजार रुपये काढण्यात आले.
आपल्या खात्यातून पैसे काढल्याचे समजल्यावर अमेरिकेतील या व्यक्तीने सीबीआयकडे तक्रार केली. तसेच आपण ऑक्टोबर २०१९ पासून भारतात आलो नसल्याचे सीबीआयला सांगितले. तसेच त्याने पासपोर्टची प्रतदेखील पुरावा म्हणून सादर केली.