रोज-रोज चटणी भात... पतीने केली चिकनची मागणी; पत्नीने नकार देताच उचलले टोकाचे पाऊल!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2025 09:58 IST2025-09-24T09:56:19+5:302025-09-24T09:58:17+5:30
लक्ष्मीनारायण नावाच्या २५ वर्षीय तरुणाने पत्नीने चिकन बनवले नाही म्हणून टोकाचे पाऊल उचलले आहे.

AI Generated Image
आंध्र प्रदेशात एका धक्कादायक घटनेने सर्वांनाच हादरवून सोडले आहे. चिकन बनवण्यावरून झालेल्या वादातून एका पतीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे कौटुंबिक वादातून होणाऱ्या गंभीर परिणामांवर पुन्हा एकदा प्रकाश पडला आहे.
नेमके काय घडले?
ही घटना आंध्र प्रदेशातील प्रकाशम जिल्ह्यातील येरागोंडापालेम मंडल येथील गोल्लाविदीपी गावात घडली आहे. लक्ष्मीनारायण नावाच्या २५ वर्षीय तरुणाने पत्नीने चिकन बनवले नाही म्हणून आत्महत्या केली.
लक्ष्मीनारायण आणि त्याची पत्नी यांच्यात चिकनवरून वाद झाला. तो गेल्या काही दिवसांपासून पत्नीच्या रोजच्या जेवणाला कंटाळला होता. त्यामुळे रविवार असल्यामुळे त्याने पत्नीला चिकन बनवण्यास सांगितले. मात्र, तिने चिकन बनवण्यास स्पष्ट नकार दिला. यावरून दोघांमध्ये जोरदार वाद झाला.
पत्नीने फेकली चटणी
वाद विकोपाला गेला असताना पत्नीला प्रचंड राग आला. रागाच्या भरात तिने लक्ष्मीनारायणवर चटणी फेकली. पत्नीच्या या कृत्याने लक्ष्मीनारायणला खूप वाईट वाटले. त्यामुळे तो घराबाहेर पडला आणि रागाच्या भरात शेतात जाऊन झाडाला गळफास घेऊन त्याने आपले जीवन संपवले.
पोलिसांनी तपास सुरू केला
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेहाचा पंचनामा करून पोलिसांनी तो शवविच्छेदनासाठी पाठवला. याप्रकरणी पोलिसांनी मृताच्या वडिलांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे.