खंडणीसाठी टोळक्यांनी मागितले १० हजार; पैसे न दिल्यानं चॉपरने केला छातीवर वार
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2021 00:01 IST2021-03-27T00:00:00+5:302021-03-27T00:01:13+5:30
पानटपरीवरची घटना, अलकापुरी येथील जे.व्ही.एस. गल्ली येथे अभिषेक चौहान याची पानटपरी आहे

खंडणीसाठी टोळक्यांनी मागितले १० हजार; पैसे न दिल्यानं चॉपरने केला छातीवर वार
नालासोपारा : अलकापुरी येथील २१ वर्षीय पानटपरी चालक तरुणाकडे २३ मार्चच्या रात्री सहा आरोपींनी चॉपरचा धाक दाखवून खंडणी मागितली. पैसे देण्यास नकार दिल्यावर गालावर आणि छातीवर चॉपरचा वार करून दुखापत केली. जखमी तरुणाने तुळिंज पोलीस ठाण्यात बुधवारी गुन्हा दाखल केला आहे.
अलकापुरी येथील जे.व्ही.एस. गल्ली येथे अभिषेक चौहान याची पानटपरी आहे. २३ मार्चला रात्री अभिषेक हा त्याच्या वडिलांसोबत पानटपरीवर होता. आरोपी सुभम मिश्रा उर्फ बाबा, अरुण सिंग उर्फ तलवार, अभिषेक शर्मा, आशिष शर्मा व दोन मित्र असे सहा जण आले. अभिषेककडे १० हजारांचा हप्ता मागितला. त्याने पैसे नसल्याचे सांगितले; पण आरोपी काहीही ऐकत नसून चॉपर दाखवून धमकावत होते. पैसे देत नाही हाच राग मनात धरून आरोपी सुभम मिश्रा उर्फ बाबा याने त्याच्या गालावर चॉपरचा वार केला. डाव्या छातीवर चॉपर लागून दुखापत झाली. तर आरोपी अभिषेक शर्मा, आशिष शर्मा याने त्याच्या पाठीवर चॉपरचा वार केला. वडील मुलाला वाचविण्यास गेले असता शुभम आणि दोन मित्रांनी वडिलांच्या डोक्यात बांबूने मारून दुखापत केली.
गुन्हा केला दाखल
अभिषेकला उपचारासाठी जवळच्या हॉस्पिटलमध्ये भरती केले असून, त्याच्या जबानीवरून तुळिंज पोलिसांनी बुधवारी वेगवेगळ्या कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. लवकरात लवकर आरोपींना पकडणार असल्याचे तुळिंजचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कांबळे यांनी ‘लोकमत’ला सांगितले.