अघोरी पूजेसाठी चेन्नईतून अपहरण केलेल्या बालकाची सुटका,दोन अपहरणकर्ते जेरबंद, नागपूर रेल्वेस्थानकावर कारवाई 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2021 10:33 PM2021-09-19T22:33:00+5:302021-09-19T22:55:16+5:30

Crime News: अघोरी पूजेसाठी मांत्रिकाच्या सल्ल्यावरून चार वर्षीय चिमुकल्याचे तामिळनाडूतून अपहरण करून मध्यप्रदेशकडे निघालेल्या दोन भामट्यांना नागपूर रेल्वेस्थानकावर पोलिसांनी अटक केली.

Child abducted from Chennai for Aghori Puja released, two abductors arrested, action taken at Nagpur railway station | अघोरी पूजेसाठी चेन्नईतून अपहरण केलेल्या बालकाची सुटका,दोन अपहरणकर्ते जेरबंद, नागपूर रेल्वेस्थानकावर कारवाई 

अघोरी पूजेसाठी चेन्नईतून अपहरण केलेल्या बालकाची सुटका,दोन अपहरणकर्ते जेरबंद, नागपूर रेल्वेस्थानकावर कारवाई 

googlenewsNext

- नरेश डोंगरे
नागपूर : अघोरी पूजेसाठी मांत्रिकाच्या सल्ल्यावरून चार वर्षीय चिमुकल्याचे तामिळनाडूतून अपहरण करून मध्यप्रदेशकडे निघालेल्या दोन भामट्यांना नागपूर रेल्वेस्थानकावर पोलिसांनी अटक केली.  मोनू गरीबदास केवट (वय २६, रा. कोलार महंत, ता. बरेली, जि. रायसेन) आणि शिब्बू गुड्डू केवट ( वय २२, रा. बोरासधाट, ता. उदयपूरा, जि. रायसेन, मध्यप्रदेश) अशी आरोपींची नावे असून, त्यांच्या ताब्यातून चिमुकल्याची सुटका करण्यात आली असून तो सुखरूप आहे. या अपहरणकांडाला नरबळीचा पैलू जुळला असल्याचे प्राथमिक चौकशीतून उघड झाल्याने खुद्द पोलीसही हादरले आहेत.

ट्रेन नंबर ०२६२१ च्या कोच नंबर डीएल-१मध्ये  ९ आणि १० क्रमांकाच्या बर्थवर दोन आरोपी चेन्नई तामिळनाडू येथून बसले असून ते चार वर्षाच्या चिमुकलीचे अपहरण करून त्याला इटारसीला घेऊन जात असल्याची माहिती चेन्नई लोहमार्ग पोलिसांनी नागपूरच्या रेल्वे पोलीस नियंत्रण कक्षाला कळविली. त्यावरून निरीक्षक आर. एल. मीना, सहायक उपनिरीक्षक सुहासिनी लादे त्यांचे सहकारी तसेच लोहमार्ग पोलिसांच्या निरीक्षक मनीषा काशीद आपल्या सहकाऱ्यांसह फलाट क्रमांक एकवर कारवाईसाठी सज्ज झाल्या. दुपारी १ वाजून ५० मिनिटांनी ट्रेन नागपूर रेल्वे स्थानकावर येताच संबंधित कोचला पोलिसांनी चोहोबाजूने घेरून तपासणी केली. नऊ आणि दहा क्रमांकाच्या आसनावर संशयित आरोपीं चिमुकल्या सोबत बसून होते. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. त्यांचे तसेच चिमुकल्याचा फोटो व्हाट्सअप वरून चेन्नई पोलिसांना पाठविण्यात आला. अपहरण करण्यात आलेल्या हाच तो बालक आणि हेच आरोपी असल्याचे चेन्नई पोलिसांनी स्पष्ट केले. त्यामुळे रेल्वे पोलिसांनी आरोपी दोघांना अटक केली.

सोमवारी चेन्नई पोलीस, पालक पोहचणार
 आरोपींच्या ताब्यातील बालक अतिशय घाबरलेले होते. पोलिसांनी लगेच चाईल्ड लाईनच्या पदाधिकाऱ्यांना बोलवून बालकाला त्यांच्या स्वाधीन केले. सोमवारी तामिळनाडू (चेन्नई) पोलीस आणि चिमुकल्याचे पालक नागपुरात पोहचणार आहेत. त्यांच्या हवाली बालक केले जाणार आहे. रेल्वेचे वरिष्ठ मंडळ सुरक्षा आयुक्त आशुतोष पाण्डेय तसेच लोहमार्ग पोलीस अधीक्षक एम. राजकुमार, अतिरिक्त पोलीस अधीक्षक वैशाली शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक  मनीषा काशीद, उपनिरीक्षक विजय तायवाडे, ओमप्रकाश भलावी, सहायक फौजदार कुवर, हवालदार ऊके, नायक मिश्रा, शिपाई घुरडे, खवसे, नरूले, मोगरे तसेच महिला शिपाई नेवारे यांनी ही कारवाई केली.


 
चेन्नई पोलिसांची तत्परता
आरोपी मध्यप्रदेशातील रहिवाशी असून गेल्या तीन वर्षापासून ते रोजगाराच्या निमित्ताने चेन्नईतील अंबतूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहत होते. नमूद बालकाचे घर बाजूलाच असल्याने या बालकाला ते कधी चॉकलेट तर कधी खाऊ घेऊन द्यायचे. त्यामुळे चिमुकला त्यांच्या अंगावर होता. बालकाच्या आई वडिलांचाही आरोपींवर विश्वास होता. त्यामुळे त्याला शनिवारी आरोपींनी सोबत नेले. तेव्हा नेहमीप्रमाणे चॉकलेट वगैरे घेऊन ते परत येतील, असे पालकांना वाटले होते. मात्र आरोपींनी विश्वासघात करून बालकाचे अपहरण केले. सायंकाळ झाली तरी ते परत आले नाही. त्यामुळे घाबरलेल्या बालकाच्या पालकांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. चिमुकल्याचे अपहरण झाल्याचे लक्षात येताच चेन्नई पोलिसांनी कमालीची तत्परता दाखवली. रेल्वे स्टेशनवरचे सीसीटीव्ही फुटेज चेक केले. त्यातून आरोपी नमूद क्रमांकाच्या ट्रेनमध्ये बसल्याचे दिसून आले. त्या डब्यातील पीएनआर नंबर तपासून पोलिसांनी तातडीने सर्वत्र वायरलेस संदेश दिला. नमूद रेल्वेगाडी नागपूर मार्गे मध्यप्रदेशात जाणार असल्याचे लक्षात येताच चेन्नई पोलिसांनी नागपूर लोहमार्ग पोलिसांना माहिती कळविली आणि त्याचमुळे नागपुरात पोलिसांना अपहरणकर्त्यांना ताब्यात घेणे सहज शक्य झाले.

प्राथमिक चौकशीतच पोलीस थरारले
 आरोपींनी या अपहरणच्या गुन्ह्याचा उद्देश प्राथमिक चौकशीत सांगितला. तो ऐकून पोलीस काही वेळेसाठी शहारले. दोन पैकी एका आरोपीला मूलबाळ नाही. त्यामुळे त्याच्या गावातील मांत्रिकाने त्याला मुल बाळ होण्यासाठी मुंडन झालेला (केस न कापलेला) बालक पूजेसाठी आणल्यास तुला मूलबाळ होतील, असे सांगितले होते. त्यावरून आरोपीने या चिमुकल्याचे अपहरण केल्याची कबुली दिली. गावात नेल्यानंतर अघोरी पूजा किंवा नरबळी साठी चिमुकल्याचा वापर केला जाणार होता, हे आरोपीच्या प्राथमिक चौकशीतून उघड झाल्याने काही क्षणासाठी पोलीसही शहारले. या कारवाईमुळे एक मोठा गुन्हा टळला, अशी माहिती रेल्वे पोलीस अधीक्षक राजकुमार यांनी लोकमतला दिली.

Web Title: Child abducted from Chennai for Aghori Puja released, two abductors arrested, action taken at Nagpur railway station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.