Chhattisgarh Crime: छत्तीसगडमधील खैरागड छुईखदान गंडाई जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका तरुणाने आपल्या विवाहित प्रेयसीला परत मिळवण्यासाठी तिच्या सासरच्या लोकांना बॉम्बने उडवण्याचा कट रचला. मात्र, बॉम्ब न फुटल्याने मोठा अनर्थ टळला. या प्रकरणातील ७ आरोपींना पोलिसांनी अटक केली असून, पुढील तपास सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ४० दिवसांपूर्वी लग्न करून सासरच्या घरी गेलेल्या आपल्या प्रेयसीला परत मिळवण्यासाठी, एका वेड्या प्रियकराने तिच्या सासरी पार्सल बॉम्ब पाठवून संपूर्ण कुटुंबाला उडवून देण्याचा भयानक कट रचला. मात्र, काही कारणांमुळे बॉम्ब फुटलाच नाही. त्यानंतर, या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांनी प्रियकरासह ७ जणांना अटक केली.
एसपी लक्ष्य विनोद शर्मा यांनी या प्रकरणाचा खुलासा करताना सांगितले की, जिल्ह्यातील कुस्मी गावातील २० वर्षीय आरोपी विनयचे जवळच्या गावात राहणाऱ्या एका मुलीशी प्रेमसंबंध होते. ४० दिवसांपूर्वी तिचे लग्न झाले आणि ती गंडाई पोलिस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या मानपूर येथील तिच्या सासरी गेली. प्रेयसीचे लग्न झाल्यामुळे विनय अतिशय दुःखी झाला.
प्रेयसीला परत मिळवण्यासाठी आरोपीने तिच्या पतीसह संपूर्ण कुटुंबाला उडवण्याचा कट रचला. आरोपीने ऑनलाइन बॉम्ब कसा बनवायचा हे शिकले आणि होम थिएटरमध्ये सुमारे २ किलोचा आयईडी ठेवून डिटोनेटर प्लगला जोडला, जेणेकरून करंट सप्लाय मिळताच तो स्फोट होईल. हा हेम थिएटर गिफ्ट पॅक करुन प्रेयसीच्या घरी पाठवला. सुदैवाने हा बॉम्ब फुटला नाही. त्यानंतर, पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून आधी बॉम्ब निकामी केला आणि त्यानंतर या प्रकरणात सहभागी असलेल्या ७ हून अधिक आरोपींना अटक केली.