पती तुरुंगात, ३० वर्षीय पत्नीचे ६७ वर्षाच्या वृद्धासोबत अफेअर, हत्या करुन पळून गेला बॉयफ्रेंड
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2025 12:54 IST2025-08-25T12:54:18+5:302025-08-25T12:54:40+5:30
छत्तीसगडमध्ये एका वृद्धाने त्याच्या प्रेयसीची निर्घृणपणे हत्या केल्याने खळबळ उडाली.

पती तुरुंगात, ३० वर्षीय पत्नीचे ६७ वर्षाच्या वृद्धासोबत अफेअर, हत्या करुन पळून गेला बॉयफ्रेंड
Chhattisgarh Crime: गेल्या काही दिवसांपासून देशभरातून प्रेमप्रकरणांमधून गुन्हेगारीच्या घटनांची अनेक प्रकरणं समोर आली आहेत. अशातच छत्तीसगडमध्ये हादरवून टाकणारी घटना समोर आली. छत्तीसगडच्या धमतरी जिल्ह्यात ६७ वर्षीय वृद्ध प्रियकराने त्याच्या ३० वर्षीय प्रेयसीची निर्घृणपणे हत्या केली. वृद्ध प्रियकराला त्याच्या प्रेयसीचे दुसऱ्या कोणाशी तरी प्रेमसंबंध असल्याचा संशय होता. याच रागातून त्याने संधी मिळताच तिची हत्या केली. पोलिसांनी आरोपीला अटक करून तुरुंगात पाठवले.
धमतरी जिल्ह्यातील करेली बडी इथल्या परिसरात हा सगळा प्रकार घडला. आरोपी प्रियकराचे नाव जगन्नाथ मार्कंडे असं आहे. तो जिल्ह्यातील हसदा गावचा रहिवासी आहे. जगन्नाथ शेतकरी म्हणून काम करतो. त्याचे एका ३० वर्षीय विवाहित महिलेशी प्रेमसंबंध होते. पुष्पा मार्कंडे असं हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे. जगन्नाथला त्याच्या प्रेयसीचे दुसऱ्या कोणाशी तरी प्रेमसंबंध असल्याचा संशय येऊ लागला होता, त्यामुळे त्याने तिला मारण्याचा कट रचला. संधी मिळताच त्याने तिला चाकूने भोसकून ठार मारले.
गेल्या आठवड्यात शनिवारी हा सगळा प्रकार घडला. पुष्पा कुठेतरी जाण्याच्या तयारीत होती. शनिवारी ती तिच्या मुलासोबत वाहनाची वाट पाहत होती. तेव्हा जगन्नाथ तिथे आला आणि त्याने पुष्पावर चाकूने हल्ला केला. आरोपीने पुष्पाच्या पाठीवर आणि पोटावर चाकूने अनेकदा वार केले. पुष्पाच्या मुलाने तिला वाचवण्याचा प्रयत्न केला पण तोही या हल्ल्यात जखमी झाला. त्यानंतर मुलाने गावकऱ्यांना जगन्नाथने केलेल्या हल्ल्याची माहिती दिली. त्यानंतर गावकरी तिथे धावत घटनास्थळी पोहोचले आणि दोघांनाही रुग्णालयात नेले. मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने पुष्पाचा मृत्यू झाला.
त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला. या प्रकरणाची चौकशी करताना पोलिसांना पुष्पाचा पती तुरुंगात असल्याची माहिती मिळाली. जगन्नाथ मार्कंडे एका वर्षापासून पुष्पाला मदत करत होता. या काळात दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले. काही दिवसांनी जगन्नाथला पुष्पाचे दुसऱ्या कोणाशी तरी प्रेमसंबंध असल्याचा संशय आला, ज्यामुळे त्याने तिला मारण्याचा कट रचला. त्यामुळे त्याने पुष्पाची निर्घृणपणे हत्या करुन तिथून पळ काढला. पोलिसांनी तपास करुन आरोपी जगन्नाथला शोधून काढलं आणि त्याला तुरुंगात पाठवलं.