मद्य तस्करी : चेन्नई एक्स्प्रेसमध्ये दारूच्या २१२ बॉटल जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2019 23:27 IST2019-12-23T23:26:12+5:302019-12-23T23:27:52+5:30
जयपूर-चेन्नई एक्स्प्रेसमधून होणारी मद्यतस्करी लोहमार्ग पोलिसांच्या स्थानिक गुन्हेशाखेने पकडली असून, आरक्षित कोचमधून दारूच्या २१२ बॉटल जप्त करण्यात आल्या आहेत.

मद्य तस्करी : चेन्नई एक्स्प्रेसमध्ये दारूच्या २१२ बॉटल जप्त
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जयपूर-चेन्नई एक्स्प्रेसमधून होणारी मद्यतस्करी लोहमार्ग पोलिसांच्या स्थानिक गुन्हेशाखेने पकडली असून, आरक्षित कोचमधून दारूच्या २१२ बॉटल जप्त करण्यात आल्या आहेत.
रेल्वेगाडी क्रमांक १२९६८ जयपूर-चेन्नई एक्स्प्रेसच्या एस ११ कोचमधून दारूची तस्करी होत असल्याची गुप्त माहिती लोहमार्ग पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेतील अमोल हिंगणे, रोशन अली यांना मिळाली. त्यामुळे ही गाडी नागपूर रेल्वेस्थानकावर येण्यापूर्वीच पोलीस रेल्वेस्थानकावर हजर होते. ही गाडी दुपारी २.१७ वाजता नागपूर रेल्वेस्थानकावर आली. पथकातील सदस्यांनी एस ११ कोचमध्ये तपासणी केली. यावेळी बर्थ क्रमांक ५५, ५६ च्या खाली तीन बॅग बेवारस स्थितीत आढळल्या. बॅगबाबत कोचमधील प्रवाशांना विचारणा केली असता कुणीच या बॅग आपल्या असल्याचे सांगितले नाही. त्यामुळे या बॅगची तपासणी केली असता एका बॅगमध्ये दारूच्या १००, दुसऱ्या बॅगमध्ये ६० आणि तिसऱ्या बॅगमध्ये ५२ अशा २१२ बॉटल आढळल्या. पकडण्यात आलेल्या दारूची किंमत १४ हजार रुपये आहे. लोहमार्ग पोलिसांनी दारूच्या बॉटल जप्त करून अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.