हुंड्यासाठी पती झाला हैवान! दागिने, AC साठी टॉर्चर; लग्नानंतर ३ दिवसांनी नववधूने संपवलं जीवन
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2025 14:38 IST2025-07-01T14:36:43+5:302025-07-01T14:38:56+5:30
एका नवविवाहित महिलेने लग्नाच्या तीन दिवसांतच पती आणि सासरच्या लोकांच्या छळाला कंटाळून टोकाचं पाऊल उचललं आहे.

हुंड्यासाठी पती झाला हैवान! दागिने, AC साठी टॉर्चर; लग्नानंतर ३ दिवसांनी नववधूने संपवलं जीवन
चेन्नईमध्ये हुंड्यासाठी छळ केल्यामुळे महिलेने आत्महत्या केल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे. एका नवविवाहित महिलेने लग्नाच्या तीन दिवसांतच पती आणि सासरच्या लोकांच्या छळाला कंटाळून आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललं आहे. २७ जून रोजी लग्न झालं होतं. वधू फक्त तीन दिवस तिच्या सासरच्या घरी राहिली. हुंड्यासाठी होणारा छळ सहन न झाल्याने ३० जून रोजी नववधूने माहेरी आत्महत्या केली.
सोमवारी संध्याकाळी हे जोडपं वधू लोकेश्वरीच्या पालकांच्या घरी आलं होतं. येथे हुंड्यावरून पतीशी झालेल्या भांडणानंतर लोकेश्वरी बाथरूममध्ये गेली आणि तिने आत्महत्या केली. पतीने लोकेश्वरीला तिच्या पालकांकडे अधिक दागिने, एअर कंडिशनर आणि घरातील वस्तू मागण्यास सांगितलं होतं. दोघांमध्येही यावरून वाद झाला आणि लोकेश्वरीने आत्महत्या केली.
२२ वर्षीय लोकेश्वरीचे वडील गजेंद्रन यांनी पोन्नेरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. एक दिवसाआधीच तामिळनाडूतील तिरुपूर येथे एका नवविवाहित महिलेने तिच्या सासरच्यांच्या छळाला कंटाळून आत्महत्या केली होती. २७ वर्षीय रिधान्या तिच्या कारमध्ये कीटकनाशक गोळ्या खाल्ल्यानंतर मृतावस्थेत आढळली.
अन्नादुराई यांची मुलगी रिधान्या हिने एप्रिलमध्ये २८ वर्षीय कविनकुमारशी लग्न केलं. या लग्नात ८०० ग्रॅम सोन्याचे दागिने आणि ७० लाख किमतीची व्होल्वो कार हुंडा म्हणून देण्यात आली. आत्महत्या करण्यापूर्वी रिधान्याने तिच्या वडिलांची माफी मागणारे सात व्हॉट्सअॅप ऑडिओ मेसेज पाठवले आणि दावा केला की, ती हुंड्यासाठी होणारा छळ सहन करू शकत नाही.