लॉटरी सिस्टीमच्या नावाने महिलेची फसवणूक; ४५ तोळे सोनं, २८ लाख रुपयांना लावला चूना, गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2021 16:16 IST2021-07-17T16:16:08+5:302021-07-17T16:16:28+5:30
उल्हासनगर कॅम्प नं-३ फॉरवर्ड लाईन परिसरात राहणाऱ्या पूजा सुरींदर सहोता या महिलेने कल्याण चिकणघर येथे राहणाऱ्या उर्मिला भेरे यांना लॉटरी सिस्टीममध्ये अधिक नफा व चांगल्या परताव्याचे अमिष दाखवून पैसे गुंतविण्यास सांगितले.

लॉटरी सिस्टीमच्या नावाने महिलेची फसवणूक; ४५ तोळे सोनं, २८ लाख रुपयांना लावला चूना, गुन्हा दाखल
सदानंद नाईक -
उल्हासनगर- लॉटरी सिस्टिममध्ये जास्त नफा व चांगल्या परताव्याचे अमिष दाखवून येथील उर्मिला भेरे यांची मोठी फसवणूक झाली आहे. फेब्रुवारी ते डिसेंबर २०१८ दरम्यान त्यांची तब्बल २८ लाख रोख आणि ४५ तोळ्यांची फसवणूक झाली आहे. याप्रकरणी पूजा सहोता या महिलेवर मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी तपासात मोठे घबाड येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
उल्हासनगर कॅम्प नं-३ फॉरवर्ड लाईन परिसरात राहणाऱ्या पूजा सुरींदर सहोता या महिलेने कल्याण चिकणघर येथे राहणाऱ्या उर्मिला भेरे यांना लॉटरी सिस्टीममध्ये अधिक नफा व चांगल्या परताव्याचे अमिष दाखवून पैसे गुंतविण्यास सांगितले. या आमिषाला बळी पडून उर्मिला भेरे यांनी फेब्रुवारी ते डिसेंबर २०१८ दरम्यान रोख रक्कम व सोन्याचे दागिने गुंतविले. सुरवातीला पूजा सहोता हिने विश्वास बसविण्यासाठी भेरे यांना २ लाख ९० हजार रोख स्वरूपात परत दिले. मात्र त्यानंतर ठरल्या प्रमाणे दोन वर्षात रोख रक्कम व सोन्याचे दागिने परत न दिल्याने, आपली फसवणूक झाल्याचे उर्मिला यांच्या लक्षात आले. त्यांनी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात धाव घेऊन आपली २८ लाख रोख रक्कम आणि ४५ तोळे सोन्याच्या दागिन्यांची फसवणूक झाल्याची तक्रार दाखल केली आहे.
मध्यवर्ती पोलीस ठाण्यात २८ लाख रुपये व ४५ तोळे सोन्याच्या दागिन्यांचा अपहार केल्याचा गुन्हा पूजा सहोता याच्यावर दाखल केला. पूजा हिने अशा किती महिलांची व लोकांची फसवणूक केली. याबाबत पोलीस तपास करीत असून मोठे घबाड समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.