Fraud Case : इंटरनेटवर नोकरीच्या बहाण्याने तरुणीची केली फसवणूक
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2022 17:42 IST2022-05-30T16:00:10+5:302022-05-30T17:42:56+5:30
Cheating Case : ३२ वर्षीय तरुणी बुशरा अब्दुल हफीज शेख ही नोकरी हवी म्हणून इंटरनेटवर शोध घेत होती.

Fraud Case : इंटरनेटवर नोकरीच्या बहाण्याने तरुणीची केली फसवणूक
मीरारोड - नोकरीसाठी इंटरनेटवर शोध घेत असताना एका जाहिरातीद्वारे तरुणीची ६६ हजारांना फसवणूक झाल्या प्रकरणी मीरारोडच्या नया नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
३२ वर्षीय तरुणी बुशरा अब्दुल हफीज शेख ही नोकरी हवी म्हणून इंटरनेटवर शोध घेत होती. त्यावेळी नोकरीचा शोध घेत असताना नटराज प्रायव्हेट लिमीटेड कंपनीची जाहिरात दिसली. त्यावरील भ्रमणध्वनी क्रमांकावर कॉल करून नोकरीबाबत विचारणा केली. सदर कंपनी घरी पेन्सिल बॉक्स पॅकिंगचे काम देते आणि दरदिवशी १०० बॉक्स पॅकिंग करून दिल्यास महिना ३० हजार रुपये पगार व आता १५ हजार ऍडव्हान्स दिले जाणार असल्याचे तिला सांगण्यात आले.
नोकरीसाठी नोंदणी आणि ओळखपत्र शुल्क म्हणून १०५० रुपये ऑनलाईन भरण्यास सांगितले. ते पैसे भरल्यानंतर ओळखपत्र शेख यांच्या Whats Appवर पाठवण्यात आले. नंतर मात्र अनामत रक्कम, डिलिव्हरी, विलंब शुल्क आणि जीएसटीसाठी ६५ हजार ९५० रुपये भरण्यास सांगितले. तसेच सदर रक्कम पगारासोबत परत मिळणार असल्याचे सांगितल्याने शेख हिने त्यानुसार रक्कम पाठवली. परंतु पैसे पाठवून झाल्यावर तिने कॉल केला असता समोरच्या व्यक्तीने तिचा नंबर ब्लॉक करून ठेवला. फसवणूक झाल्याचे तिच्या लक्षात आल्याने पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.