२ ऑफिसर, १७ लोको पायलटसह २६ जणांना अटक, १ कोटी कॅश जप्त...; CBI ची मोठी कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2025 10:23 IST2025-03-05T10:23:09+5:302025-03-05T10:23:47+5:30
सीबीआयने पंडित दीनदयाळ उपाध्याय (पीडीडीयू) रेल्वे विभागाच्या विभागीय परीक्षेदरम्यान फसवणुकीच्या आरोपाखाली २६ जणांना अटक केली आहे.

२ ऑफिसर, १७ लोको पायलटसह २६ जणांना अटक, १ कोटी कॅश जप्त...; CBI ची मोठी कारवाई
उत्तर प्रदेशातील चंदौली येथे सीबीआय अँटी करप्शन ब्युरोच्या पथकाने मोठी कारवाई केली आहे. येथे सीबीआयने पंडित दीनदयाळ उपाध्याय (पीडीडीयू) रेल्वे विभागाच्या विभागीय परीक्षेदरम्यान फसवणुकीच्या आरोपाखाली २६ जणांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये दोन वरिष्ठ रेल्वे अधिकारी, १७ लोको पायलट आणि इतर लोकांचा समावेश आहे. लखनौ येथील सीबीआय पथकाने चंदौली येथील एका मॅरेज लॉनमधून अनेक जणांना ताब्यात घेतलं आहे. हे सर्वजण दुसऱ्यांच्या जागी विभागीय परीक्षेला बसले होते असा आरोप करण्यात आला आहे.
१ कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीची रोकडही जप्त करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. प्रमोशनसाठी घेण्यात आलेल्या या विभागीय परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी उमेदवारांकडून मोठ्या प्रमाणात पैसे वसूल करण्यात आल्याचा आरोप आहे आणि परीक्षा घेण्यासाठी सॉल्व्हर्सना बोलावण्यात आलं होतं. माहिती मिळताच, सीबीआयने सोमवारी रात्री मॅरेज लॉनवर छापा टाकला आणि दुसऱ्यांच्या जागी परीक्षेला बसणाऱ्या अनेक लोकांना रंगेहाथ पकडलं. अटक केलेल्या आरोपींकडून परीक्षेचे पेपरही जप्त करण्यात आले आहेत. या कारवाईमुळे संपूर्ण रेल्वे विभागात खळबळ उडाली.
मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणात पंडित दीनदयाळ उपाध्याय रेल्वे विभागाचे दोन वरिष्ठ अधिकारी आणि लोको पायलटसह एकूण २६ जणांना अटक करण्यात आली आहे. रेल्वेच्या विभागीय पदोन्नती परीक्षेतील पेपरफुटी प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. रेल्वेच्या लोको इन्स्पेक्टरसाठी ही विभागीय पदोन्नती परीक्षा ४ मार्च रोजी होणार होती, परंतु त्यापूर्वीच, पेपरफुटीची माहिती मिळाल्यानंतर सीबीआय पथकाने छापे टाकले आणि २६ जणांना अटक केली. सध्या सीबीआयचे पथक या सर्व आरोपींना सोबत घेऊन लखनौला रवाना झालं आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सीबीआयच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या लखनौ शाखेच्या पथकाला पंडित दीनदयाळ उपाध्याय रेल्वे विभागांतर्गत ४ मार्च रोजी होणाऱ्या रेल्वेच्या लोको इन्स्पेक्टरच्या विभागीय पदोन्नती परीक्षेत मोठ्या प्रमाणात फसवणूक झाल्याची माहिती मिळाली होती आणि त्याचा पेपर फुटला होता. ही माहिती मिळाल्यानंतर, लखनौ सीबीआय शाखेचं पथक सक्रिय झालं आणि या पथकाने पंडित दीनदयाळ उपाध्याय रेल्वे विभागाच्या अधिकाऱ्यांच्या निवासस्थानांवर तसेच मंगळवारी परीक्षेला बसणाऱ्या उमेदवार लोको पायलटच्या निवासस्थानांवर छापे टाकले.