जाहिरातीच्या शूटिंगसाठी आलेल्या फ्रेंच पर्यटकावर बलात्कार; आरोपीला पोलिसांनी केली अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2025 18:12 IST2025-06-25T18:11:13+5:302025-06-25T18:12:05+5:30
फ्रेंच पर्यटक महिलेवर उदयपूरमध्ये बलात्कार

जाहिरातीच्या शूटिंगसाठी आलेल्या फ्रेंच पर्यटकावर बलात्कार; आरोपीला पोलिसांनी केली अटक
Rajasthan Crime: राजस्थानच्या उदयपूरमध्ये एका इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीच्या कर्मचाऱ्याने एका फ्रेंच पर्यटक महिलेवर बलात्कार केल्याचा आरोप करण्यात आला. आरोपी तरुणाने प्रथम एका कॅफेमध्ये पार्टी केली, नंतर महिलेला टूरला घेऊन जाण्याच्या बहाण्याने त्याच्या भाड्याच्या फ्लॅटमध्ये नेले आणि तिच्यावर बलात्कार केला. पीडितेने रुग्णालयात दाखल होऊन एफआयआर दाखल केला. या घटनेतील आरोपीचं नाव सिद्धार्थ असं असून त्याला अटक करण्यात आली आहे. आरोपीला चित्तोडगढ येथून अटक करण्यात आली आहे. तो एका कास्टिंग कंपनीचा मालक आहे. तो चित्रपट, जाहिराती, गाणी आणि मालिकांसाठी कास्टिंग करतो. तो सलमान खान आणि अक्षय कुमार सारख्या बॉलिवूड स्टार्ससाठी कास्टिंग करतो.
पीडित महिला, इतर दोन मैत्रिणी आणि एका इव्हेंट मॅनेजमेंट फर्मचे काही कर्मचारी रविवारी संध्याकाळी उदयपूरच्या बडगाव परिसरातील टायगर हिल्स येथील रेस्टॉरंटमध्ये गेले होते. पीडित महिला इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीने आयोजित केलेल्या एका जाहिरातीच्या शूटिंगसाठी उदयपूरमध्ये आली होती. पीडिता १७ एप्रिलपासून भारतात असून २२ जून रोजी दिल्लीहून एका बसने उदयपूरला आली होती. त्यानंतर हा सगळा प्रकार घडला.
"पीडित महिलेने सांगितले की ती सिद्धार्थ नावाच्या व्यक्तीच्या कारमध्ये निघून गेली. त्याने तिला त्याच्या खोलीवर नेले व तिच्यावर अत्याचार केला. आम्ही रेस्टॉरंट आणि हॉटेलमधील फुटेज तपासत आहोत", अशी माहिती उदयपूरच्या पोलिस अधीक्षकांनी दिली.
दुसरीकडे, अटकेनंतर आरोपी पुष्पराज उर्फ सिद्धार्थ ओझा (२९) याने मा हनी ट्रॅपमध्ये अडकले गेल्याचे म्हटलं आहे. बॉलिवूडमधील काही लोक मला अडकवत आहेत, असा सिद्धार्थचा आरोप आहे. पुष्पराज हा चित्तोडगडच्या गंगारार तहसील परिसरातील रहिवासी आहे. तो सुमारे ८ वर्षांपासून उदयपूरमध्ये राहत आहे.
आरोपी आणि त्याच्या सहकाऱ्याची कास्टिंग कॉल नावाची कंपनी आहे. या कंपनीने तरुणीला शूटसाठी कामावर ठेवले होते. ती मुलगी २२ जून रोजी उदयपूरला मोबाईल जाहिरातीच्या शूटसाठी आली होती. त्याच दिवशी पिचोला, सज्जनगड किल्ला आणि जवळच्या रेस्टॉरंट्समध्ये शूटिंग करण्यात आले. त्यानंतर, संध्याकाळी टायगर हिल येथील द ग्रीक फार्म आणि रेस्ट्रो कॅफेमध्ये क्रू मेंबर्सनी पार्टी केली. पार्टी दरम्यान, सिद्धार्थने फ्रेंच मुलीला धूम्रपान करण्याच्या बहाण्याने सुखेर येथील त्याच्या फ्लॅटवर नेले आणि तिच्यावर बलात्कार केला. चौकशीदरम्यान पुष्पराजने आपला गुन्हा कबूल केल्याचा दावा पोलिसांनी केला. सात दिवसांत तपास पूर्ण केल्यानंतर त्याला न्यायालयात सादर केले जाईल. ही मुलगी बऱ्याच काळापासून दिल्लीत राहत आहे. ती यापूर्वीही राजस्थानमध्ये आली आहे.