Karnataka Crime:कर्नाटकच्या यादगीर जिल्ह्यातील एका कथित ढोंगी बाबाचा संतापजनक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. एका सात वर्षांच्या चिमुरडीसोबत अश्लील कृत्य केल्याप्रकरणी या मल्लिकार्जुन मुत्तवा नावाच्या बाबावर पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. धक्कादायक बाब म्हणजे, ज्यावेळी हा प्रकार घडत होता, त्यावेळी मुलीचे आई-वडील तिथेच उपस्थित होते आणि तेच हा व्हिडिओ काढत होते.
यादगीरमधील शहापूर येथील एका मठात हा प्रकार घडला. व्हायरल व्हिडिओमध्ये हा ढोंगी बाबा ७ वर्षांच्या चिमुरडीला आपल्या मांडीवर बसवून तिला चुकीच्या पद्धतीने स्पर्श करताना आणि तिचे चुंबन घेताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये ती मुलगी अत्यंत अस्वस्थ आणि घाबरलेली दिसत असतानाही, तिचे आई-वडील मात्र हा सर्व प्रकार पाहत होते आणि स्वतःच त्याचा व्हिडिओ बनवून त्यांनी तो सोशल मीडियावर अपलोड केला.
पालकांचा अजब दावा
या प्रकरणाचा तपास करत असताना पोलिसांनी मुलीच्या आई-वडिलांचे जबाब नोंदवले आहेत. हे कुटुंबीय महाराष्ट्रातील सोलापूर येथील रहिवासी आहेत. धक्कादायक बाब म्हणजे, पालकांनी पोलिसांना सांगितले की, बाबांच्या स्पर्शात आम्हाला काहीही चुकीचे वाटले नाही. त्यांच्या मते, हा एक आशीर्वादाचा प्रकार होता. मात्र, बाल हक्क आयोगाने हा दावा फेटाळून लावला.
बाल हक्क आयोगाची कडक भूमिका
कर्नाटक राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाने या व्हिडिओची स्वतःहून दखल घेतली. यादगीरच्या पोलीस अधीक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार, बालकल्याण समितीने मुलीचे आणि पालकांचे समुपदेशन केले. व्हिडिओमध्ये मुलगी स्पष्टपणे अस्वस्थ दिसत असल्याने समितीने तात्काळ एफआयआर नोंदवण्यास सांगितले. जिल्हा बाल संरक्षण अधिकाऱ्यांनी त्या आश्रमाला भेट देऊन आपला अहवाल सादर केला.त्यानंतर पोलिसांनी पोक्सोच्या कलमांखाली गुन्हा नोंदवला.
"आम्ही या प्रकरणाचा तपास सुरू केला असून आरोपीला नोटीस बजावण्यात आली आहे. जरी पालकांना यात काही गैर वाटले नसले, तरी कायद्यानुसार बालकांचे शोषण सहन केले जाणार नाही," असे पोलीस प्रशासनाने स्पष्ट केले आहे. श्रद्धेच्या नावाखाली चिमुरड्यांचे लैंगिक शोषण करणाऱ्या अशा भोंदू बाबांविरोधात आता कर्नाटकात संतापाची लाट उसळली आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अशा नराधमांना कठोर शिक्षा देण्याची मागणी करण्यात येत आहे.