कुंपणच शेत खातंय! विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याच्या हवालदाराविरोधात लाच प्रकरणी गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2021 21:26 IST2021-11-23T21:25:22+5:302021-11-23T21:26:09+5:30
Bribe Case : तक्रारदाराने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केल्यावर मंगळवारी दुपारी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात लाचलुचपत विभागाच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला.

कुंपणच शेत खातंय! विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याच्या हवालदाराविरोधात लाच प्रकरणी गुन्हा दाखल
सदानंद नाईक
उल्हासनगर : विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याचे हवालदार रवींद्र सपकाळे यांनी एका गुन्ह्यात मदत करण्याचे सांगून २ हजार लाचेची मागणी तक्रारदार यांच्याकडे केली. तक्रारदाराने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केल्यावर मंगळवारी दुपारी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात लाचलुचपत विभागाच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला.
उल्हासनगरातील विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यामध्ये गुन्ह्यातील तक्रारदार विरोधात एक गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात मदत करण्याचे व न्यायालयात जामीन मिळवून देण्यासाठी २ हजार रुपयांच्या लाचेची मागणी पोलीस ठाण्याचे हवालदार रवींद्र सपकाळे यांनी तक्रारदार यांच्याकडे केली. याप्रकरणी तक्रारदार यांनी ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर विभागाचे पोलीस निरीक्षक विनायक जगताप यांच्या पथकाने मंगळवारी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात पोलीस हवालदार रवींद्र सपकाळे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. याप्रकरणी अधिक तपास ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधिकारी करीत आहेत.