रायपूरमधील कार चोरीचे कनेक्शन यवतमाळात; छत्तीसगड पोलीस दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2021 21:24 IST2021-05-24T21:23:35+5:302021-05-24T21:24:23+5:30
Crime News : रेती माफियाने नागपुरातून घेतली कार

रायपूरमधील कार चोरीचे कनेक्शन यवतमाळात; छत्तीसगड पोलीस दाखल
यवतमाळ : सेल्फ ड्रायव्हींगसाठी कार भाड्याने देणाऱ्या कंपनीलाच काहींनी गंडा घातला. भाड्याने नेलेल्या तीन कार चोरल्या. या चोरीचे कनेक्शन यवतमाळपर्यंत असल्याचे पोलीस तपासात पुढे आले. रायपूर (छत्तीसगड) येथील आझादनगर पोलिसांचे पथक रविवारी यवतमाळात आले होते.
रायपूर येथील ट्रीप्सी ही कंपनी ग्राहकांना सेल्फ ड्रायव्हींगसाठी कार भाड्याने देते. तीन कार परस्परच चोरुन नेल्या होत्या यातील दोन कार रायपूर पोलिसांनी हस्तगत केल्या. मात्र एक कार अनेक महिन्यांपासून हाती लागत नव्हती. याचा तपास करीत रायपूरच्या आझादनगर पोलीस ठाण्याचे पथक यवतमाळात दाखल झाले. अपहरण व मारहाणीच्या गुन्ह्यात अटकेत असलेल्या रेती तस्कराने ही कार खरेदी केल्याचे पुढे आले. यवतमाळ शहर पोलिसांच्या मदतीने रायपूर पोलिसांनी नागपूर रोडवरील शर्मा ले-आऊट येथून ही चोरीची कार हस्तगत केली. यात अटकेतील आरोपी अजय गोलाईत याचा जबाब नोंदवून सूचना पत्र दिले. त्याला भादंवि कलम ४११ प्रमाणे आरोपी करण्यात येणार आहे. अजय गोलाईत हा अपहरण व मारहाणीच्या गुन्ह्यात शहर पोलिसांच्या कोठडीत आहे. त्यामुळे रायपूर पोलिसांनी अटकेची कारवाई केली नाही.
अजय गोलाईत याने अतिशय कमी किंमतीत ही आलिशान कार नागपूर येथून खरेदी केल्याचे पोलिसांना सांगितले. यापूर्वीसुद्धा पुणे येथील कार चोरीचे कनेक्शन यवतमाळशी जुळले होते. त्यावेळी तीन कार पुणे पोलिसांनी जप्त केल्या होत्या.
चोरीच्या वाहनांचा मोठा व्यापार
महानगरातून चोरी गेलेली आलिशान वाहने कमी किंमतीत खरेदी करून त्याचा सर्रास वापर केला जात आहे. यवतमाळ शहर व परिसर अशा वाहन खरेदीचे केंद्रच बनले आहे. अनेक चोरीची वाहने येथे राजरोसपणे वापरली जात असल्याचे पोलीस कारवायातून उघड झाले आहे.