समन्स न देता बोलावले अन् घरीच ईडीने ताब्यात घेतले, नवाब मालिकांच्या वकिलाचा युक्तिवाद
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2022 18:05 IST2022-02-23T18:00:37+5:302022-02-23T18:05:25+5:30
Nawab Malik Arrested : वैद्यकीय तपासणीसाठी त्यांना जे जे रुग्णालयात नेले होते. ईडी कार्यालयाबाहेर तणाव वाढला आहे असून एनसीपीचे कार्यकर्ते आक्रमक झाले.

समन्स न देता बोलावले अन् घरीच ईडीने ताब्यात घेतले, नवाब मालिकांच्या वकिलाचा युक्तिवाद
मुंबई - राज्य सरकारमधील मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांना ईडीने चौकशीसाठी कार्यालयात नेले आहे. तिथे सकाळपासून त्यांची चौकशी सुरू आहे. भल्या पहाटे ईडीने नवाब मलिक यांच्यावर कारवाई केल्याने राज्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, ही कारवाई सुडबुद्धीने करण्यात आल्याचा आरोप राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून करण्यात येत आहे. मात्र अंमलबजावणी संचलनालयाने चौकशीअंती नवाब मलिक यांना अटक केली आहे. सत्र न्यायालयातील विशेष पीएमएलए कोर्टात नवाब मलिक यांना हजर केले असून सुनावणीस सुरवात झाली आहे. नवाब मलिकांना १४ दिवसांच्या कोठडीची मागणी ईडीने कोर्टाकडे केली आहे. तसेच नवाब मलिक यांचे वकील अमित देसाई यांनी कोर्टात सांगितले की, मला समन्स न देता बोलावले आहे आणि ईडीने मलाच घरी ताब्यात घेतले. वैद्यकीय तपासणीसाठी त्यांना जे जे रुग्णालयात नेले होते. ईडी कार्यालयाबाहेर तणाव वाढला आहे असून एनसीपीचे कार्यकर्ते आक्रमक झाले.
3 फेब्रुवारी रोजी एनआयएने दाऊदविरोधात गुन्हा दाखल केला असे ईडीने ऍडिशनल सॉलिसिटर जनरल अनिल सिंग यांनी सांगितले. मनी लांड्रिंग, ड्रग्ज तस्करी तसेच अन्य गुह्यांत दाऊदचा सहभाग असून दाऊद इब्राहिम हा जैश ए मोहम्मदसोबत काम कारतो. दाऊदची बहीण हसिना पारकर हिचे निधन झाले आहे, ती या सर्व कामांवर नियंत्रण ठेवत असे. अनेक मालमत्ता ताब्यात घेऊन त्यांनी निधी उभारला आहे. कुर्ल्यातील गोवाले कंपाऊंडमधील मालमत्ताही हसीनाने जप्त केली आहे. मुनिरा आणि मरियम या दोघी या मालमत्तेच्या खऱ्या मालक आहेत. ही त्यांची वडिलोपार्जित मालमत्ता होती, ती दोघांच्या मालकीची होती, त्यांचे जबाबही नोंदवण्यात आले आहेत. गोवा कंपाऊंड ही तीच जमीन आहे ज्यावर नवाब मलिक यांच्यावर आरोप आहेत, असा युक्तिवाद अनिल सिंग यांनी केला.
Nawab Malik: आठ तासांच्या चौकशीनंतर नवाब मलिक यांना ईडीकडून अटक; राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक