लेडी कंडक्टरला तब्बल ६१५९ कॉल, ३१५ मेसेज; ‘तो’ म्हणाला, ‘माझ्याशी लग्न कर नाहीतर…'
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2025 14:12 IST2025-09-01T14:12:18+5:302025-09-01T14:12:38+5:30
एकतर्फी प्रेमात वेड्या झालेल्या तरुणाने एका लेडी कंडक्टरच्या आयुष्यात अक्षरश: धुमाकूळ घातला आहे.

लेडी कंडक्टरला तब्बल ६१५९ कॉल, ३१५ मेसेज; ‘तो’ म्हणाला, ‘माझ्याशी लग्न कर नाहीतर…'
एकतर्फी प्रेमात वेड्या झालेल्या एका तरुणाने उत्तर प्रदेशच्या महोबा जिल्ह्यात एका लेडी कंडक्टरच्या आयुष्यात अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. लग्नासाठी वारंवार दबाव आणण्यापासून ते ॲसिड हल्ला करण्याची धमकी देण्यापर्यंत, या तरुणाने सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. तब्बल ६ हजार १५९ वेळा फोन कॉल आणि ३१५ मेसेज करून त्याने या तरुणीला हैराण केले आहे. यामुळे दहशतीच्या छायेखाली असलेल्या या तरुणीने अखेर पोलिसांत धाव घेतली.
हे प्रकरण चरखारी कोतवाली परिसरातील आहे. पीडित तरुणीने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत सांगितले आहे की, मोहम्मद रईस नावाचा तरुण गेल्या काही काळापासून तिच्यावर लग्नासाठी दबाव आणत आहे. ही तरुणी महोबा येथील राज्य परिवहन महामंडळात कार्यरत आहे. तिने लग्नास नकार दिल्यानंतर आरोपीने तिला ॲसिड हल्ला करण्याची आणि तिचे अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली.
नोकरीही सोडली, कारण…
पीडित तरुणीने दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने वेगवेगळ्या मोबाईल नंबरवरून तिला कॉल केले आहेत. एका नंबरवरून ४,३८७ वेळा, तर दुसऱ्या नंबरवरून १,७७२ वेळा कॉल करण्यात आला आहे. एवढंच नव्हे, तर ३१५ मेसेजही पाठवले आहेत, ज्यामध्ये जीवे मारण्याच्या धमक्यांचाही समावेश आहे. त्याच्या सततच्या त्रासाला कंटाळून पीडित तरुणीने नोकरीवर जाणेही बंद केले आहे.
हे एवढ्यावरच थांबले नाही. आरोपी रईसने पीडितेच्या कानपूरमध्ये राहणाऱ्या बहिणीलाही फोन करून त्रास दिला आहे. पीडितेने सांगितले की, आरोपीने तिचा कामाच्या ठिकाणी बॅग हिसकावून घेऊन तिला तुरुंगात पाठवण्याची आणि जर तिचे लग्न दुसऱ्या कोणाशी झाले तर तिच्या वडिलांवर ॲसिड हल्ला करण्याची धमकी दिली आहे. या सततच्या धमक्यांमुळे पीडितेवर दहशतीच्या सावटाखाली जगण्याची वेळ आली आहे. सध्या, पोलिसांनी पीडितेच्या तक्रारीनुसार आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, या प्रकरणाचा तपास सुरू आहे.