बक्सरचा शेरु! ज्याची रुग्णालयात गोळ्या घालून हत्या करण्यात आली, तो चंदन मिश्रा कोण?
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2025 15:43 IST2025-07-17T15:40:49+5:302025-07-17T15:43:44+5:30
Paras Hospital Murder Case: बिहारची राजधानी पाटण्यात भयंकर हत्याकांड घडले. रुग्णालयात घुसून गुंडांनी दुसऱ्या एका गुंडाची हत्या केली. चंदन मिश्रा असे त्याचे नाव.

बक्सरचा शेरु! ज्याची रुग्णालयात गोळ्या घालून हत्या करण्यात आली, तो चंदन मिश्रा कोण?
Patna Hospital Murder News: सकाळची वेळ होती. रुग्णालयात नेहमीप्रमाणे शांतता होती. त्याचवेळी पाच जण रुग्णालयात आले. अतिदक्षता विभागातील २०९ नंबरच्या खोलीबाहेर ते आले. सगळ्यांनी पिस्तूल काढले अन् खोलीत घुसले. काही सेकंदात अंदाधूंद गोळीबार केला. उपचार घेत असलेल्या चंदन मिश्राची हत्या करून ते लगेच पसार झाले. या हत्याकांडाने बिहारची राजधानी हादरली. पण, या गुंडांनी ज्याची हत्या करण्यात आली, तो चंदन मिश्रा कोण होता?
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
पाटणातील पारस रुग्णालयात चंदन मिश्रा उपचार घेत होता. तुरुंगात असतानाच त्याची प्रकृती बरी नव्हती. पॅरोलवर बाहेर आल्यानंतर तो रुग्णालयात दाखल झाला होता. त्याच्या हालचालींवर लक्ष ठेवून असलेल्या विरोधी टोळीतील गुंडांनी त्याला गाठलं आणि संपवलं.
चंदन मिश्रा के पारस अस्पताल में मर्डर का सीसीटीवी फुटेज आया सामने।
— Tejashwi Yadav (@Tejashwi4u) July 17, 2025
लोग अब अस्पताल मे भी सुरक्षीत नही है ... बिहार में ।#biharcrimepic.twitter.com/IJQGqsf02B
कोण होता चंदन मिश्रा?
बक्सर जिल्ह्याचा रहिवासी असलेला चंदन मिश्रा तुरुंगात एका हत्या प्रकरणात शिक्षा भोगत होता. इतरही हत्या प्रकरणात त्याचे नाव आहे. इंडस्ट्रियल पोलीस ठाणे हद्दीत २०११ मध्ये एक दुहेरी हत्याकांड घडले होते. त्यात चंदन मिश्राचे नाव समोर आले होते.
यात पहिली हत्या २० एप्रिल २०११ रोजी झाली होती. ज्याची हत्या झाली त्या व्यक्तीचे नाव होते भरत राय. दुसरी हत्या झाली होती शिवजी खरवार याची. या हत्या चंदन मिश्राने केल्याचा आरोप होता.
चंदन मिश्राने व्यापाऱ्याची केली होती हत्या
त्यानंतर तुरुंगातील लिपीक हैदर अली यांची हत्या झाली. त्या प्रकरणातही चंदन मिश्रावर आरोप होते. हफ्ता दिला नाही म्हणून चंदन मिश्राने एका व्यापारी राजेंद्र केसरी यांचीही हत्या केली होती. याच प्रकरणात चंदन मिश्राला आजन्म कारावासाची शिक्षा झाली होती.
काही जणांच्या लागोपाठ हत्या केल्यानंतर चंदन मिश्राबद्दल भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. चंदन मिश्रा बक्सर का शेरू या नावाने गँग चालवत होता. याच गँगवॉरमधून त्याची हत्या झाल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.
चंदन मिश्राची ज्यांनी हत्या केली, ते आरोपी ज्या पद्धतीने रुग्णालयात आले आणि हत्या करून गेले; त्यातून असेच दिसते की हा खून टोळी युद्धातून झाला असावा. ही हत्या पूर्वनियोजित आहे. कुणीतरी चंदन मिश्राची करत असावे, असा संशयही पोलिसांना आहे.
१८ जुलैला तुरुंगात जाणार होता चंदन मिश्रा
चंदन मिश्राला १२ फेब्रुवारी २०२द रोजी पाटणा उच्च न्यायालयाने आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली होती. तो आधी बक्सर तुरुंगात होता. त्यानंतर त्याला भागलपूर तुरुंगात हलवण्यात आले होते. त्याच्या जीवाला धोक्या असल्याने पुन्हा त्याला पाटणातील बेऊर तुरुंगात हलवण्यात आले होते. काही दिवसांपूर्वी त्याला पॅरोल मंजूर झाला होता. १८ जुलै रोजी त्याचा पॅरोल संपणार होता, त्यापूर्वीच त्याची हत्या करण्यात आली.