लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : शंकरनगर भागात वडिलांवर सतत मारहाण करत अखेर विष पाजण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी मुलाविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात २३ ऑगस्ट रोजी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही धक्कादायक घटना ४ ते ६ ऑगस्ट दरम्यान घडली.
तक्रारीनुसार, प्रल्हाद मधुकर उमाळे (५०) हे शंकरनगर येथे पत्नीसमवेत राहतात. त्यांचा मुलगा शुभम प्रल्हाद उमाळे (२४) हा वारंवार वाद घालत असल्याची तक्रार आहे. ४ ऑगस्ट रोजी दुपारी प्रल्हाद उमाळे पत्नीला किरकोळ खर्चासाठी पैसे देत असताना शुभमने संतापून वडिलांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर संध्याकाळी पुन्हा हल्ला केला. ५ ऑगस्ट रोजी सकाळी सातच्या सुमारास आरोपी शुभम मद्यधुंद अवस्थेत घरी आला व शिवीगाळ करून वडिलांना मारहाण केल्याचे तक्रारीत म्हटले. जखमी उमाळे यांना पत्नीने रुग्णालयात नेले. त्यानंतर त्यांनी पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली.
या तक्रारीची माहिती कळताच आरोपी शुभमने संतापून ५ ऑगस्टच्या रात्री पुन्हा मारहाण केली. ६ ऑगस्ट रोजी सकाळी आठ वाजता वडील घरी झोपलेले असताना शुभमने त्यांच्या छातीवर पाय ठेवून गळा दाबला व जबरदस्तीने गुलाबी रंगाचा ट्यूब गिळायला लावला. त्यामुळे त्यांना विषबाधा झाली असून उपचार सुरू असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
याप्रकरणी पोलीस तक्रार आणि तक्रारदारांच्या जबाबावरून शुभम उमाळे याच्याविरुद्ध कलम १०९ (१), ११५ (२), ३५२, ३५१ (१) (२) भादंवि अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोउपनि विनोद खांबलकर करत आहेत.