पैशांसाठी पोलिसांची हैवानियत! पास झाला म्हणून पार्टी करणाऱ्या विद्यार्थ्याला मारहाण; पॅनक्रियाज हॅमरेजने मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2025 16:38 IST2025-10-11T16:33:12+5:302025-10-11T16:38:30+5:30
मध्य प्रदेशात एका पोलीस अधिकाऱ्याच्या मेहुण्याच्या पोलिसांच्या अमानुष मारहाणीत मृत्यू झाला.

पैशांसाठी पोलिसांची हैवानियत! पास झाला म्हणून पार्टी करणाऱ्या विद्यार्थ्याला मारहाण; पॅनक्रियाज हॅमरेजने मृत्यू
MP Crime: भोपाळमध्ये एका २१ वर्षीय बी-टेक विद्यार्थ्याचा पोलिसांच्या कथित मारहाणीत मृत्यू झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. उदित गयाकी (२१) असे या मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. पदवी मिळाल्याचा आनंद साजरा करण्यासाठी मित्रांसोबत पार्टी करत असताना ही दुर्दैवी घटना घडली. रात्री उशिरा पार्टीतून परतत असताना, दोन पोलिसांनी त्याला बेदम मारहाण केली, ज्यामुळे त्याचा मृत्यू झाला. या घटनेचा एक व्हिडिओ देखील समोर आला आहे, ज्यामध्ये पोलिस विद्यार्थ्याला काठ्यांनी मारहाण करताना दिसत आहेत. उदित तीन दिवसांपूर्वी त्याच्या कॉलेजमधून काही कागदपत्रे घेण्यासाठी बंगळुरूहून भोपाळला आला होता.
उदित गयाकी हा नुकताच बी-टेक पदवीधर झाला होता आणि तो त्याच्या मित्रांसोबत इंद्रपुरी येथील एका पार्किंग परिसरात पार्टी करत होता. गुरुवारी आणि शुक्रवारच्या मध्यरात्री सुमारे दीड वाजण्याच्या सुमारास गस्तीवर असलेल्या संतोष बामनिया आणि सौरभ आर्य या दोन पोलीस कर्मचाऱ्यांनी त्यांना पाहिले. पोलिसांनी त्यांच्याशी गैरवर्तन केले. त्यामुळे घाबरून उदित जवळच्या गल्लीत पळून गेला, मात्र पोलिसांनी त्याचा पाठलाग केला आणि त्याला काठीने बेदम मारहाण केली. मित्रांनी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला असता, पोलिसांनी सार्वजनिक ठिकाणी दारू पिण्याचा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली आणि प्रकरण मिटवण्यासाठी १० हजारांची लाच मागितली.
मारहाणीनंतर उदितला अस्वस्थ वाटू लागले. त्याला उलट्यांचा त्रास झाला आणि तो घाबरला होता. त्याच्या एका मित्राने त्याला घरी सोडण्यासाठी कारमध्ये घेतले. प्रवासादरम्यान, उदितची तब्येत खूपच बिघडली. मध्यरात्री ४ वाजताच्या सुमारास तो आनंद नगर पोलीस चौकीजवळ कोसळला. उदितला तातडीने एआयआयएमएस भोपाळ येथे नेण्यात आले, पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. शवविच्छेदन अहवालात उदितच्या मृत्यूचे कारण पॅनक्रियाटिक हॅमरेज असल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्याच्या शरीरावर काठीने मारल्याच्या खुणा आढळल्या आहेत.
उदित हा एका पोलिस उपायुक्त अधिकाऱ्याचा मेहुणा आहे. या घटनेनंतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दोन्ही आरोपी पोलीस कर्मचाऱ्यांवर तत्काळ निलंबनाची कारवाई केली आहे. या प्रकरणी दोषींवर हत्येचा गुन्हा दाखल करायचा की सदोष मनुष्यवधाचा याचा कायदेशीर सल्ला पोलीस घेत आहेत. पदवी मिळाल्याच्या आनंदाची ही पार्टी कुटुंबासाठी दु:खाची ठरली असून या घटनेमुळे पोलीस अत्याचाराच्या गंभीर मुद्द्यावर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.