पहाटेच्या वेळी घरात घुसून महिलेच्या डोक्यात प्रहार करत निर्घृण खून; काळेवाडी येथील घटना 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2020 21:46 IST2020-10-16T15:15:15+5:302020-10-16T21:46:31+5:30

घराच्या उघड्या दरवाजातून प्रवेश करून पहाटे घडलेल्या या खुनामुळे काळेवाडी परिसरात खळबळ उडाली आहे.

Brutal murder by breaking into a house in the morning and hitting a women in the head; Incident at Kalewadi | पहाटेच्या वेळी घरात घुसून महिलेच्या डोक्यात प्रहार करत निर्घृण खून; काळेवाडी येथील घटना 

पहाटेच्या वेळी घरात घुसून महिलेच्या डोक्यात प्रहार करत निर्घृण खून; काळेवाडी येथील घटना 

पिंपरी : घराच्या उघड्या दरवाजातून प्रवेश करून डोक्यात कठीण वस्तूने प्रहार करून महिलेचा खून केल्याची घटना काळेवाडीत शुक्रवारी पहाटे पाचच्या सुमारास उघडकीस आली. यात मृताची विहिण गंभीर जखमी झाली आहे. पहाटे घडलेल्या या प्रकारामुळे काळेवाडी परिसरात खळबळ उडाली आहे.

छाया पांडुरंग गुंजाळ (वय ५५ रा. तुळजाभवानी कॉलनी, नढे नगर काळेवाडी) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. विहिण मंगल साहेबराव सत्वधर (वय ४८) यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे. गुंजाळ यांच्या मागे दोन सासू, पती, मुलगा, सून असा परिवार आहे. सून बाळांतीन झाल्याने त्यांची विहिण घरी आल्या होत्या. या प्रकरणी संतोष पांडुरंग गुंजाळ (वय ३३) यांनी फिर्याद दिली आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अप्पर आयुक्त रामनाथ पोकळे, परिमंडळ दोनचे उपायुक्त आनंद भोईटे यांनी घटनास्थळाला भेट दिली.

फिर्यादी यांची आजी सुंदराबाई भानुदास गुंजाळ या भाजीचा व्यवसाय करतात. त्यांचा पिंपरी येथे गाळा आहे. नेहमीप्रमाणे त्या पहाटे चारच्या सुमारास दरवाजा अर्धवट उघडा ठेऊन गाळ्यावर गेल्या. घराच्या हॉलमध्ये छाया गुंजाळ, पांडुरंग गुंजाळ, आजी सुंदराबाई आणि फिर्यादीच्या सासूबाई सत्वधर झोपल्या होत्या. अज्ञात व्यक्तीने चार ते पाचच्या सुमारास घरात प्रवेश करीत जड वस्तूने गुंजाळ यांच्या डोक्यात प्रहार केला. पाठोपाठ सत्वधर यांच्या डोक्यात कठीण वस्तूने प्रहार केला. जोराचा आवाज ऐकून गुंजाळ याचे पती जागे झाले. मात्र अंधाराचा फायदा घेऊन खुनी पसार झाला होता. जखमी सत्वधर यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु असून, त्यांच्या जीवाला धोका नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले असल्याची माहिती वाकड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विवेक मुगळीकर यांनी दिली.

Web Title: Brutal murder by breaking into a house in the morning and hitting a women in the head; Incident at Kalewadi