डी गँगसाठी काम करणाऱ्या भावांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2022 06:41 IST2022-05-14T06:41:25+5:302022-05-14T06:41:36+5:30
छोटा शकीलसोबत पैशांचा व्यवहार उघडकीस येताच एनआयएची कारवाई

डी गँगसाठी काम करणाऱ्या भावांना अटक
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याच्या विरोधातील ऑपरेशन डी गँग अंतर्गत सलग चार दिवसांच्या चौकशीनंतर राष्ट्रीय तपास यंत्रणेने मुंबईतील दोन भावांना बेड्या ठोकल्या आहेत. दोघांचेही दाऊदचा हस्तक छोटा शकीलसोबत केलेले व्यवहार समोर येताच ही अटकेची कारवाई करण्यात आली आहे. शुक्रवारी दोघांनाही २० मेपर्यंत एनआयए कोठडी सुनावण्यात आली आहे.
आरिफ अबू बकर शेख (५९) आणि शकील अबू बकर शेख उर्फ शब्बीर (५१) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. दोघेही मुंबईतील ओशिवरा परिसरात वास्तव्यास आहेत. एनआयएच्या पथकांनी सोमवारी डी कंपनीचे शार्पशूटर, ड्रग्ज तस्कर, हवाला ऑपरेटर, बांधकाम क्षेत्रातील हस्तक आणि गुन्हेगारी सिंडिकेटमधील अन्य प्रमुखांच्या मुंबईतील २४ आणि ठाण्यातील पाच अशा एकूण २९ ठिकाणी छापेमारी केली.
एनआयएने या छापेमारीमध्ये ताब्यात घेतलेली कागदपत्रे आणि इलेक्ट्रॉनिक दस्तऐवजांच्या आधारे एनआयए दाऊद टोळीच्या दहशतवाद्यांना अर्थपुरवठा, अमली पदार्थांची तस्करी आणि बनावट चलनाच्या पुरवठ्यासह आर्थिक व्यवहारांचा तपास करत आहे. यासाठी एनआयएने छोटा शकील याचा साडू सलीम कुरेशी उर्फ सलीम फ्रूट आणि बांधकाम व्यावसायिक सोहेल खंडवानी यांच्यासह अजय गोसालिया, गुड्डू पठाण, मुनाफ शेख, अस्लम पठाणी, समीर हिंगोरिया, कय्युम शेख, आरिफ शेख आणि शब्बीर शेख अशा १८ जणांकडे कसून चौकशी सुरू केली आहे. तपासात आरिफ आणि शब्बीर यांचे छोटा शकील याच्याशी झालेले आर्थिक व्यवहार समोर येताच, एनआयएने गुरुवारी रात्री उशिराने या दोघांना अटक केली. डी कंपनीच्या मुंबईच्या पश्चिम उपनगरांत बेकायदेशीर कारवाया हाताळण्यात दोघांचाही सहभाग हाेता.
छोटा शकीलचाही शोध सुरू
दुसरीकडे छोटा शकीलचाही शोध सुरू आहे. इंटरपोलने त्याच्या विरोधात रेड कॉर्नर नोटीस बजावत अधिक तपास सुरू ठेवला आहे. छोटा शकील ‘डी गँग’चे आंतरराष्ट्रीय सिंडिकेट सांभाळत असून, त्याचा खंडणी, तस्करीसह दहशतवादी कारवायांमध्ये सहभाग असल्याचेही एनआयएने नमूद केले आहे.