मेहुण्याचा जाच आणि भावाचा राग! दारू पाजली अन् सपासप केले वार; वादाचं कारण ऐकून होईल संताप
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2025 09:22 IST2025-12-25T09:22:23+5:302025-12-25T09:22:49+5:30
एका मंदिरासमोर रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या तरुणाचा मृतदेह सापडल्याने परिसरात खळबळ माजली होती.

मेहुण्याचा जाच आणि भावाचा राग! दारू पाजली अन् सपासप केले वार; वादाचं कारण ऐकून होईल संताप
रक्ताचे नाते आणि जवळचे नातेवाईकच जेव्हा जीवावर उठतात, तेव्हा कशाप्रकारे होत्याचे नव्हते होते, याचा प्रत्यय कर्नाटकच्या धारवाड जिल्ह्यात आला आहे. एका मंदिरासमोर रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या तरुणाचा मृतदेह सापडल्याने परिसरात खळबळ माजली होती. पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली आणि जे सत्य समोर आले, त्याने पोलीसही चक्रावून गेले. स्वतःच्या वागण्याने त्रासलेल्या मेहुण्याने आणि सख्ख्या भावाने मिळून विठ्ठल कुराडी नावाच्या तरुणाची निर्घृण हत्या केल्याचे उघड झाले आहे.
नेमकं प्रकरण काय?
धारवाडच्या रामनाकोप्पा गावात राहणारा विठ्ठल कुराडी हा एका मंडप डेकोरेशनच्या दुकानात काम करायचा. संसाराचा गाडा हाकत असताना त्याला दारूचे भीषण व्यसन जडले. या व्यसनामुळे तो घरी गेल्यावर पत्नी कस्तुरीशी दररोज भांडण करायचा, तिला मारहाण करायचा. या छळाला कंटाळून कस्तुरी आपल्या तीन मुलांना घेऊन माहेरी निघून गेली होती. पण, विठ्ठलचा त्रास तिथेही थांबला नव्हता.
भावाचा राग आणि मेहुण्याचा संताप
विठ्ठलच्या मृत्यूमागे दोन वेगळी कारणे होती. एकीकडे त्याचा मेहुणा पुंडलिक आपल्या बहिणीला होणाऱ्या त्रासामुळे पेटून उठला होता. तर दुसरीकडे, विठ्ठलचा सख्खा भाऊ अन्नाप्पा हा देखील त्याच्यावर कमालीचा संतापलेला होता. काही दिवसांपूर्वी विठ्ठलने अन्नाप्पाची सायकल चोरली होती आणि रागाच्या भरात ती जाळून खाक केली होती. या दोन वेगवेगळ्या कारणांमुळे विठ्ठलचे हे दोन जवळचे नातेवाईक त्याचे कट्टर शत्रू बनले होते.
रात्रीच्या अंधारात रचला मृत्यूचा सापळा
२३ डिसेंबर रोजी विठ्ठल आपल्या मामाच्या गावी गेला होता. तिथे तो एका मंदिरासमोर झोपला होता. याच संधीचा फायदा घेत पुंडलिक आणि अन्नाप्पा तिथे पोहोचले. त्यांनी आधी विठ्ठलला विश्वासात घेऊन भरपूर दारू पाजली. विठ्ठल नशेत धुंद होताच, दोघांनी धारदार शस्त्रांनी त्याच्यावर सपासप वार केले. या हल्ल्यात विठ्ठलचा जागीच मृत्यू झाला.
पोलिसांनी ठोकल्या बेड्या
कालाघाटगी पोलीस स्टेशनच्या पथकाने घटनेचा पंचनामा करून तपास सुरू केला. विठ्ठलचे कुणाशी वाद होते, याची माहिती काढली असता भाऊ आणि मेहुण्यावर संशय बळावला. पोलिसांनी खाक्या दाखवताच दोघांनीही आपला गुन्हा कबूल केला. सायकल जाळल्याचा बदला आणि बहिणीचा छळ थांबवण्यासाठी आपण हे पाऊल उचलल्याचे त्यांनी सांगितले. सध्या दोन्ही आरोपी पोलिसांच्या कोठडीत असून अधिक तपास सुरू आहे.