लाचखोर वाढले; महसूल पहिल्या तर सोलापूर ग्रामीण पोलीस दुसऱ्या क्रमांकावर
By Appasaheb.patil | Updated: March 19, 2023 17:24 IST2023-03-19T17:24:02+5:302023-03-19T17:24:29+5:30
मागील वर्षातील जानेवारी-फेब्रुवारीचा आकडा पाहिला असता ५ लाचखोर जास्त सापडल्याची नोंद झाली आहे.

लाचखोर वाढले; महसूल पहिल्या तर सोलापूर ग्रामीण पोलीस दुसऱ्या क्रमांकावर
आप्पासाहेब पाटील
सोलापूर : शासकीय कामे करताना लोकसेवकांकडून जनसामान्यांची अडवणूक करून लाचेची मागणी करण्यात येते. सर्वच शासकीय कार्यालयांत लाच दिल्याशिवाय कामे होत नाही. त्यात महसूल विभाग आघाडीवर असून, पोलिस खात्याचा दुसरा क्रमांक लागतो. मागील सव्वा दोन महिन्यांत सोलापूर जिल्ह्यात लाचखोरीच्या ८ घटना घडल्या आहेत. त्यात १२ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मागील वर्षातील जानेवारी-फेब्रुवारीचा आकडा पाहिला असता ५ लाचखोर जास्त सापडल्याची नोंद झाली आहे.
दरम्यान, २०२३ वर्षाच्या सुरुवातीला राज्य उत्पादन शुल्क विभागाचा जवान जामिनासाठी मदत करण्यासाठी २० हजारांची लाच स्वीकारली. त्यानंतर जामिनावर सोडण्याकरिता ग्रामीणच्या दोन पोलिस अधिकारी यांच्यासह एका खासगी व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल झाला. होमगार्डलाही १० हजारांची लाच घेताना रंगेेहाथ पकडले. पंढरपुरात मंडल अधिकारी यास १ लाख लाचेची मागणी केल्यामुळे पकडले. डांबरी रस्त्यात मोजमापे पुस्तकावर सही करण्यासाठी सहा. अभियंता यास पकडले. उत्तर तालुक्यातील महिला व बालकल्याण विभागातील किशोर मोरे यास पकडले. भू-करमापक यास जमीन मोजणीसाठी लाच देताना पकडले. त्यानंतर उतारा देण्यासाठी तलाठ्यास लाच घेताना रंगेेहाथ पकडले.