कंत्राटदाराकडून घेतली ११ हजार रुपयांची लाच; कार्यकारी अभियंत्याला एसीबीने केली अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2021 21:14 IST2021-02-10T21:13:37+5:302021-02-10T21:14:14+5:30
ACB arrested Executive engineer : तक्रारीवरून गुरुवारी सापळा रचण्यात आला. कार्यकारी अभियंत्याच्या कार्यालयातील कक्षात मानकर बसलेला असताना, त्याने तक्रारदार कंत्राटदाराकडून लाचेची रक्कम स्वीकारली.

कंत्राटदाराकडून घेतली ११ हजार रुपयांची लाच; कार्यकारी अभियंत्याला एसीबीने केली अटक
मोर्शी (अमरावती) : महावितरणचा मोर्शी येथील कार्यकारी अभियंता धर्मेंद्र मुगुटराव मानकर (५५) याला केबिनमध्ये ११ हजारांची लाच घेताना गुरुवारी सायंकाळी अटक करण्यात आली. वरूड येथे राहणाऱ्या ४३ वर्षीय वीज कंत्राटदाराने याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे यासंदर्भात तक्रार केली होती. त्यानुसार, एन.एस.सी. इन्फ्रा स्कीम अंतर्गतचे बारगाव, जरुड, पेठ मंगरुळी गावामध्ये केलेल्या कामाच्या देयकावर सही करून एक टक्का रक्कम सहा हजार व घोडदेव गावातील पोल्ट्री फार्मच्या कनेक्शनचे अंदाजपत्रक मंजूर करून दिल्याबद्दल पाच हजार असे एकूण ११ हजार रुपये लाचेची मागणी धर्मेंद मानकरने केली होती. यापूर्वीसुद्धा त्यांनी लाच मागितले असल्याचे समजते.
तक्रारीवरून गुरुवारी सापळा रचण्यात आला. कार्यकारी अभियंत्याच्या कार्यालयातील कक्षात मानकर बसलेला असताना, त्याने तक्रारदार कंत्राटदाराकडून लाचेची रक्कम स्वीकारली. याच वेळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक राहुल तसरे, विनोद कुंजाम, युवराज राठोड, सुनील जायभाये, पंकज बोरसे,वाहन चालक सतीश किटुकले यांनी कक्षात धडक देऊन त्याला अटक केली. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड, अपर पोलीस अधीक्षक अरुण सावंत, पोलीस उपअधीक्षक गजानन पडघन यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली. मानकरविरुद्ध कलम ७ भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ (२६ जुलै २०१८ चे सुधारणा) अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया वृत्त लिहिस्तोवर सुरू करण्यात आली होती.