लाच प्रकरणात पोलीस निरीक्षक निलंबित; जमादार बडतर्फ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2020 21:23 IST2020-05-25T21:22:12+5:302020-05-25T21:23:19+5:30
पोलीस अधीक्षकांनी दिला दणका

लाच प्रकरणात पोलीस निरीक्षक निलंबित; जमादार बडतर्फ
हिंगोली. तालुक्यातील माळसेलू येथील तक्रारदाराकडून लाच स्वीकारणाºया जमादारास बडतर्फ करून या घटनेनंतर आपणही अडकणार या भीतीने पोलीस निरीक्षकांनीही रजा टाकून पळ काढला. त्यामुळे त्यांनाही निलंबित केल्याचे आदेश पोलीस अधीक्षक योगेशकुमार यांनी काढले.
हिंगोली तालुक्यातील माळसेलू येथील एका तक्रारदाराचे अतिक्रमण काढून देण्यासाठी जमादार नंदकुमार मस्के याने त्याच्याकडे २५ हजारांची लाच मागितली होती. यात २0 हजार रुपये पोलीस निरीक्षक अंगद सुडके यांच्यासाठी तर पाच हजार रुपये स्वत:साठी मागितले होते. मात्र तक्रारदाराने घासाघीस केल्यानंतर दहा हजारांचा पहिला हप्ता देण्याचे ठरले. रविवारी माळसेलू शिवारात लाचलुचपतच्या पथकाने मस्केला रंगेहाथ पकडले. या प्रकरणी हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. मात्र या प्रकाराची माहिती न देताच हे प्रकरण अंगलट येण्याच्या भीतीने पोलीस निरीक्षक अंगद सुडके यांनी कोणतीही पूर्वसूचना न देता आजारी रजा टाकली. सध्या कोवीडच्या काळात ही बाब गंभीर असल्याने पोलीस अधीक्षक योगेश कुमार यांनी ही बाब गांभिर्याने घेतली. जमादार मस्के याला थेट बडतर्फच करून टाकले तर सुडके यांना निलंबित केले आहे.
मस्केला जामीन
आज जमादार मस्के यास हिंगोलीच्या न्यायालयात हजर करण्यात आले. यामध्ये मस्के याच्या वतीने अॅड.मनीष साकळे यांनी जामीनाचा अर्ज दाखल केला. या अर्जावरील युक्तीवादानंतर जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एन. बी. शिंदे यांनी जमादारास पंधरा हजार रुपयांच्या जातमुचकल्यावर जामीन मंजूर केला आहे.