दिल्लीत माणुसकीला काळिमा! छेडछाड रोखणाऱ्या उद्योजकावर जीवघेणा हल्ला; दगडांनी ठेचून ठार मारण्याचा प्रयत्न
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2026 16:42 IST2026-02-05T15:03:16+5:302026-02-05T16:42:32+5:30
दिल्लीत महिलांचा विनयभंग करणाऱ्यांना रोखल्याचा राग मनात धरुन आरोपींनी एकाला बेदम मारहाण केली.

दिल्लीत माणुसकीला काळिमा! छेडछाड रोखणाऱ्या उद्योजकावर जीवघेणा हल्ला; दगडांनी ठेचून ठार मारण्याचा प्रयत्न
Delhi Crime: देशाची राजधानी दिल्ली पुन्हा एकदा रक्तरंजित गुन्ह्याने हादरली आहे. महरौली भागातील इग्नू रोडवर एका ट्रान्सपोर्ट व्यावसायिकाने मुलींची छेड काढणाऱ्या गुंडांना थांबवणे महागात पडले. छेडछाड करणाऱ्यांनी या व्यावसायिकावर दगडांनी आणि विटांनी जीवघेणा हल्ला केला. या भीषण हल्ल्यात मुकेश कुमार (३९) हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर एम्स ट्रॉमा सेंटरमध्ये उपचार करण्यात आले.
सोमवारी रात्री संगम विहार येथे राहणारे मुकेश कुमार एका लग्न समारंभावरून घरी परतत होते. पहाटे ५:३० च्या सुमारास इग्नू रोडवर चहा पिण्यासाठी ते आपल्या कारमधून उतरले. तिथे आधीच उपस्थित असलेले चार तरुण जवळ उभ्या असलेल्या तीन महिलांवर अश्लील कमेंट्स करत होते आणि त्यांची छेड काढत होते. मुकेश यांनी सामाजिक भान जपून त्या तरुणांना हटकले आणि अशा प्रकारे महिलांशी वागणे चुकीचे आहे, असे समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्या गुंडांना याचा राग आला आणि त्यांनी मुकेश यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली.
दगडांनी ठेचून बेशुद्ध पाडले
मुकेश यांनी दिलेल्या माहितीनुसार, वाद वाढत असतानाच एका आरोपीने मागून येऊन त्यांच्या डोक्यावर जोरात प्रहार केला. मुकेश खाली पडल्यानंतर चारही आरोपींनी त्यांना दगड आणि विटांनी बेदम मारहाण सुरू केली. हल्ला इतका भीषण होता की मुकेश जागीच बेशुद्ध पडले. आरोपींनी त्यांना रक्ताच्या थारोळ्यात सोडून पळ काढला. स्थानिकांनी तातडीने त्यांना रुग्णालयात दाखल केले.
कुटुंबीयांचा आक्रोश
मुकेश यांची आई सर्वेश यांनी याप्रकरणी बोलताना आपला टाहो फोडला. "माझ्या मुलाची अवस्था बघून मी पूर्णपणे मोडून पडले आहे. सकाळी ५ वाजता पोलिसांनी माहिती दिली तेव्हा तो रक्ताने माखलेला होता. पहाटे ४ वाजेपर्यंत त्याला शुद्ध आली नव्हती," असे सांगताना त्यांना अश्रू अनावर झाले.
चारही आरोपी जेरबंद
या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर आणि तक्रार प्राप्त होताच दिल्ली पोलिसांनी तपासाची चक्र फिरवली. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे शोध घेऊन विशाल रावत, जतिन, सोनू आणि विवेक या चारही आरोपींना अटक केली आहे. त्यांच्यावर भारतीय न्याय संहितेच्या अंतर्गत हत्येचा प्रयत्न आणि विनयभंगासह अनेक गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर
भररस्त्यात महिलांची छेड काढली जात असताना आणि तिला विरोध करणाऱ्या व्यक्तीवर असा जीवघेणा हल्ला होत असल्यामुळे दिल्लीतील कायदा-सुव्यवस्थेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. संकटात सापडलेल्या महिलांच्या मदतीला धावून जाणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदारी कोणाची? असा संतप्त सवाल आता विचारला जात आहे.