प्रेयसीला लग्नाचे आमिष दाखवून बॉयफ्रेंडनेच लुटली अब्रू; त्यानंतर अज्ञाताने पाचव्या मजल्यावरून ढकलले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2026 14:35 IST2026-02-28T14:34:40+5:302026-02-28T14:35:27+5:30

एका तरुणीला आधी तिच्या प्रियकराने लग्नाचे आमिष दाखवून फसवले आणि त्यानंतर एका अनोळखी व्यक्तीने मदतीच्या बहाण्याने तिच्यावर अत्याचार करून तिची पाचव्या मजल्यावरून ढकलून हत्या केली.

Boyfriend robbed girlfriend of her reputation by promising her marriage; then pushed her from the fifth floor by an unknown person | प्रेयसीला लग्नाचे आमिष दाखवून बॉयफ्रेंडनेच लुटली अब्रू; त्यानंतर अज्ञाताने पाचव्या मजल्यावरून ढकलले

प्रेयसीला लग्नाचे आमिष दाखवून बॉयफ्रेंडनेच लुटली अब्रू; त्यानंतर अज्ञाताने पाचव्या मजल्यावरून ढकलले

ओडिशामधील जगतसिंहपूर जिल्ह्यातून एक मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. एका तरुणीला आधी तिच्या प्रियकराने लग्नाचे आमिष दाखवून फसवले आणि त्यानंतर एका अनोळखी व्यक्तीने मदतीच्या बहाण्याने तिच्यावर अत्याचार करून तिची पाचव्या मजल्यावरून ढकलून हत्या केली. पोलिसांनी या प्रकरणी दोन्ही नराधमांना अटक केली असून त्यांच्यावर अपहरण, बलात्कार आणि हत्येचे गुन्हे दाखल केले आहेत.

प्रियकराचा पहिला विश्वासघात

ही घटना २२ फेब्रुवारी रोजी घडली. पीडित तरुणी आपल्या प्रियकरासोबत घर सोडून पळून जाण्यासाठी निघाली होती. प्रियकराने तिला एका मंदिरात बोलावले आणि लग्नाचे वचन दिले. मात्र, लग्नाऐवजी तो तिला एका निर्जनस्थळी घेऊन गेला आणि तिथे तिच्यावर बलात्कार केला. या कृत्यानंतर तो नराधम तिला रामा बस स्थानकाजवळ सोडून फरार झाला. तरुणी प्रचंड घाबरलेल्या अवस्थेत तिथे बसची वाट पाहत उभी होती.

मदतीच्या बहाण्याने आले संकट

तरुणीला एकटे पाहून झारखंडहून पारादीपच्या दिशेने दुचाकीवरून जाणारा एक व्यक्ती तिथे थांबला. त्याने तरुणीला मदतीचे खोटे आश्वासन दिले आणि विश्वासात घेऊन तिला पारादीप येथील आपल्या भाड्याच्या खोलीवर नेले. पोलीस तपासात समोर आले की, या दुसऱ्या नराधमाने तिला इमारतीच्या छतावर नेले आणि तिथे तिच्यावर बलात्कार केला. अत्याचार केल्यानंतर आपले पाप लपवण्यासाठी त्याने तरुणीला पाचव्या मजल्यावरून खाली ढकलून दिले, ज्यामध्ये तिचा जागीच मृत्यू झाला.

पोलीस कारवाई आणि जनक्षोभ

दुसऱ्या दिवशी सकाळी पोलिसांना तरुणीचा मृतदेह सापडला. घटनेचे गांभीर्य ओळखून जगतसिंहपूरचे पोलीस अधीक्षक अंकित कुमार वर्मा यांनी वेगाने तपासचक्रे फिरवली आणि दोन्ही आरोपींच्या मुसक्या आवळल्या. प्राथमिक तपासात असे स्पष्ट झाले आहे की, तरुणी आधी आपल्या प्रियकराच्या क्रूरतेची शिकार झाली आणि त्यानंतर दुसऱ्या आरोपीने तिला खोटा आधार देऊन तिचा जीव घेतला.

या घटनेमुळे संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली आहे. पीडितेच्या कुटुंबाने आणि स्थानिक नागरिकांनी आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली आहे. भारतीय न्याय संहितेच्या विविध गंभीर कलमान्वये या नराधमांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक पुरावे गोळा करत आहेत.

Web Title: Boyfriend robbed girlfriend of her reputation by promising her marriage; then pushed her from the fifth floor by an unknown person