थरारक! विवाहित प्रेयसीची हत्या, मृतदेहाचे तुकडे केले; शीर अन् अवयव बसच्या चाकाखाली चिरडले, मग..
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2025 16:32 IST2025-11-15T16:32:15+5:302025-11-15T16:32:36+5:30
प्रीतीच्या मृतदेहाचे तुकडे करून त्याने महिलेचा धड सेक्टर ८२ जवळील नाल्याजवळ फेकला. तर शीर, हात आणि कपडे गाझियाबाद येथील रेल्वे ट्रॅकवर फेकले होते.

थरारक! विवाहित प्रेयसीची हत्या, मृतदेहाचे तुकडे केले; शीर अन् अवयव बसच्या चाकाखाली चिरडले, मग..
नोएडा - नोएडा ग्रेनो हायवेवर सेक्टर ८२ जवळ शीर आणि हात कापलेला महिलेचा मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली. या घटनेचा पोलिसांनी उलगडा केला आहे. मृतदेह मिळाल्यानंतर ९ दिवसांनी मृत महिलेची ओळख पटली, ती बरौला येथील प्रीती यादव असल्याचं समोर आले. प्रीतीच्या प्रियकरानेच तिची हत्या केल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे. याबाबत तपासानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली.
माहितीनुसार, प्रीतीचा प्रियकर बसचालक मोनू सिंहने त्याची हत्या केली. त्याला अटक करण्यात आली आहे. आरोपी आणि मृत महिला दोघेही विवाहित होते. आर्थिक व्यवहार, लग्नासाठी दबाव आणि मुलींचं भविष्य खराब करण्याच्या धमकीमुळे ही हत्या केल्याचे आरोपीने कबुल केले. बुधवारी ५ नोव्हेंबरला संध्याकाळी मोनूने प्रीतीला भेटायला बोलावले होते. त्यानंतर बसमधून त्याने तिला सेक्टर १०५ ला नेले. बसमध्ये जाताना या दोघांमध्ये वाद झाला. त्यावेळी मोनूने कुऱ्हाडीने प्रीतीच्या मानेवर हल्ला केला. त्यात तिचा मृत्यू झाला. या हत्येनंतर मोनूने तिच्या मृतदेहाचे तुकडे केले.
प्रीतीच्या मृतदेहाचे तुकडे करून त्याने महिलेचा धड सेक्टर ८२ जवळील नाल्याजवळ फेकला. तर शीर, हात आणि कपडे गाझियाबाद येथील रेल्वे ट्रॅकवर फेकले होते. बरौला येथे प्रीती यादव आणि मोनू सिंह दोघेही वेगवेगळ्या भाड्याच्या घरात राहायचे. २ वर्षापूर्वी प्रीती आणि मोनूची आई एका फॅक्टरीत एकत्र काम करत होत्या. त्यावेळी मोनूसोबत तिची ओळख झाली. प्रीतीला ३ मुले असून ती पतीपासून वेगळं राहायची. तिच्या घरापासून काहीच अंतरावर मोनू त्याची पत्नी, आई आणि ३ मुलांसह राहायचा. मोनू एका आश्रमात बस चालवायचा. दोघांचेही एकमेकांच्या घरी येणे जाणे होते. त्यातच मोनू आणि प्रीती यांची जवळीक वाढली.
चौकशीत आरोपी मोनूने पोलिसांना सांगितले की, प्रीती दर महिन्याला माझ्याकडे पैसे मागायची. त्याशिवाय पत्नी आणि मुलांना सोडून तिच्यासोबत राहण्यासाठी दबाव टाकत होती. जर मी हे केले नाही तर ती माझ्या मुलींचे भविष्य खराब करेल अशी सातत्याने धमकी देत होती असं आरोपी म्हणाला. बुधवारी संध्याकाळी याच गोष्टीवरून दोघांमध्ये वाद झाला. त्यावेळी मोनूने प्रीतीची हत्या केली. या प्रकरणी आरोपी मोनूला पोलिसांनी अटक केली आहे. त्याशिवाय बस, बसमधील रक्त सांडलेले काही अवशेष, हत्येसाठी वापरण्यात आलेले शस्त्र जप्त करण्यात आले आहे. गाझियाबाद येथून महिलेचे कपडेही जप्त केल्याचे पोलिसांनी सांगितले.
४ वेळा बस धुतली, फॉरेन्सिक टीमने रक्त शोधले
गाझियाबाद येथे मृतदेह फेकल्यानंतर मोनू सेक्टर ४९ ला गेला. जिथे तो नेहमी बस उभी करतो. याठिकाणी ४ वेळा त्याने ती बस धुतली. तरीही पोलिसांनी बस जप्त केल्यानंतर फॉरेन्सिक टीमच्या मदतीने रक्ताचे डाग शोधून काढले. मोनूने हत्येनंतर मृतदेहाचे शीर धडापासून वेगळे केले, कपडे काढले आणि हात कापले. शीर, हात आणि कपडे एका गोणीत टाकून गाझियाबादला घेऊन गेला. कापलेल्या अवयव त्याने अनेकदा बसने चिरडले. त्यानंतर रेल्वे ट्रॅकजवळ फेकून तिथून पसार झाला.