...म्हणून अल्पवयीन मुलाने आपल्या घरातील १ कोटीवर मारला डल्ला, वडिलांवर मान घालण्याची वेळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2025 15:19 IST2025-02-27T15:18:38+5:302025-02-27T15:19:49+5:30
पोलिसांनी अल्पवयीन मुलाच्या चार मित्रांना अटक केली. हे चारही मित्र त्याच्यापेक्षा खूप मोठे आहेत

...म्हणून अल्पवयीन मुलाने आपल्या घरातील १ कोटीवर मारला डल्ला, वडिलांवर मान घालण्याची वेळ
जगातील प्रत्येक पालक आपल्या मुलांना शिकवण्यासाठी, सक्षम करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतात. जर मुलं चुकीच्या मार्गावर जाऊ लागली तर पालक त्यांना योग्य मार्गावर आणतात किंवा शिक्षा देतात. वडील ओरडतात म्हणून कानपूरमधल्या एका मुलाने त्यांना धडा शिकवण्याचा निर्णय घेतला. मुलाला मद्यपान करण्यापासून आणि मित्रांसोबत फिरण्यापासून रोखण्यासाठी त्याच्या वडिलांनी त्याला त्यांच्या संपत्तीतून बेदखल केलं होतं. यावर मुलाला इतका राग आला की त्याने वडिलांना उत्तर देण्यासाठी स्वतःच्या घरातच डल्ला मारला.
चोरीनंतर वडिलांनी याबाबत तक्रार केली. पोलिसांनी अल्पवयीन मुलाच्या चार मित्रांना अटक केली. हे चारही मित्र त्याच्यापेक्षा खूप मोठे आहेत. पोलिसांनी मुलाने चोरलेली रोकड आणि दागिनेही जप्त केले आहेत. मुलाचे वडील हे कानपूरमध्ये मोठे व्यापारी आहेत. अल्पवयीन मुलाने वडिलांना धडा शिकवण्यासाठी आपल्या चार मित्रांसह एक प्लॅन केला.
व्यापाऱ्याच्या घरातील तिजोरीत २१ लाख रुपये रोख आणि ८० लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने होते. मुलाने त्याच्या मित्रांसह सर्व काही चोरलं आणि पळून गेला. जेव्हा वडिलांना हे कळालं तेव्हा त्यांनी पंकी पोलीस ठाण्यात मुलाविरुद्ध तक्रार दाखल केली. आपल्या मुलाचं आयुष्य उद्ध्वस्त होताना पाहून वडील रडू लागले, त्यांच्यावर मान घालण्याची वेळ आली.
वडील म्हणाले की, मी माझ्या मुलासाठी हा व्यवसाय सुरू केला आहे. मी त्याला सुधारण्यासाठी पावलं उचलली पण त्याने सगळं उद्ध्वस्त केलं. त्याला सुधारण्यासाठी मी त्याला संपत्तीतून बाहेर काढण्याचा निर्णय घेतला. याप्रकरणी सर्व आरोपींना अटक करण्यात आली आहे. पुढील कायदेशीर कारवाई केली जात आहे.