Bought a house for 90 lakhs, dug a 20 feet tunnel and stole 400 kg of silver in Jaipur | ९० लाखांना घर खरेदी केली, २० फूट भुयार खोदून ४०० किलो चांदी लांबवली; फिल्मस्टाइल चोरीने पोलीसही चकीत

९० लाखांना घर खरेदी केली, २० फूट भुयार खोदून ४०० किलो चांदी लांबवली; फिल्मस्टाइल चोरीने पोलीसही चकीत

जयपूर - चोरी करण्यासाठी चोरट्यांकडून नेहमी नवनव्या क्लुप्त्या लढवल्या जात असतात. कधीकधी काही चोरटे फिल्मस्टाइल चोऱ्या करून लोकांना आणि पोलिसांनाही धक्का देतात. असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. (Crime News) राजस्थानची राजधानी असलेल्या जयपूरमध्ये ही चोरीची घटना घडली असून, येथे चोरट्यांनी ९० लाख रुपयांना एक घर खरेदी करून त्या घरातून दुसऱ्या घरापर्यंत २० फूट लांब भुयार खणून तब्बल ४०० किलो चांदी लांबवल्याचे उघड झाले आहे. (Bought a house for 90 lakhs, dug a 20 feet tunnel and stole 400 kg of silver in Jaipur )
 
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार शहरातील प्रसिद्ध हेअरप्लांट तज्ज्ञ डॉक्टर सुनीत सोनी यांच्या घरामध्ये चोरट्यांनी हा डल्ला मारला आहे. चोरांनी बेसमेंटमध्ये तीन बॉक्समध्ये लपवून ठेवलेली कोट्यवधीची चांदी लंपास केली. चोरी करण्यासाठी चोरट्यांनी आधी डॉक्टरांच्या बंगल्याच्या मागील एक घर ९० लाख रुपयांना खरेदी केली. त्यानंतर या घरातून बंगल्यापर्यंत २० फूट लांब भुयार खोदत चोर डॉक्टरांच्या घराच्या बेसमेंटपर्यंत पोहोचले. त्यानंतर त्यांनी तेथे ठेवलेल्या चांदीवर डल्ला मारला. 

दोन दिवसांपूर्वी डॉक्टर सोनी यांनी बेसमेंटची पाहणी केली असता त्यांना चांदीचे बॉक्स गायब झाल्याचे दिसले. त्यानंतर शुक्रवारी त्यांनी याबाबत पोलिसांकडे तक्रार केली. डॉक्टर दाम्पत्याने सुमारे तीन महिन्यांपूर्वी आपल्या घरातील बेसमेंटमध्ये जमिनीच्या खाली तीन बॉक्समध्ये चांदी भरून ते जमिनीत पुरले होते. मात्र याची माहिती चोरांना मिळाली होती. चोरट्यांनी बेसमेंटमध्ये पोहोचण्यासाठी जबरदस्त योजना आखली. बेसमेंटमध्ये पोहोचण्यासाठी चोरांनी डॉक्टरांच्या बंगल्यामागे असलेले घर खरेदी केले. त्यानंतर तिथून बोगदा खोदला.   

याबाबत अधिक माहिती देताना एसीपी रायसिंह बेनिवाल यांनी सांगितले की, या टोळीमध्ये दोन-तीन किंवा त्यापेक्षा अधिक लोकांचा समावेश असण्याची शक्यता आहे. तसेच डॉक्टरांचे निकटवर्तीयच चोरीच्या या घटनेत सहभागी असू शकतात. कारण घरातील बेसमेंटमध्ये चांदीचा बॉक्स आहे आणि तो कुठे ठेवला आहे हे त्यांनाच माहिती असू शकते. दरम्यान, या प्रकरणी पोलिसांनी काही संशयितांना ताब्यात घेतले आहे. आता या प्रकरणाचा लवकरच उलगडा होईल, असा दावा पोलिसांनी केला आहे.  

Web Title: Bought a house for 90 lakhs, dug a 20 feet tunnel and stole 400 kg of silver in Jaipur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.