दोन चॅनल्सविरोधात ‘बॉलीवूड’ कोर्टात; टाइम्स नाऊ, रिपब्लिकवर बदनामीचा ठपका
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2020 06:52 IST2020-10-13T03:14:56+5:302020-10-13T06:52:51+5:30
Sushant Singh Rajput, Bollywood News: या प्रकरणात दाद मागणाऱ्यांमध्ये करण जोहर, आदित्य चोप्रा, फरहान अख्तर आदी नामवंतांचाही समावेश आहे

दोन चॅनल्सविरोधात ‘बॉलीवूड’ कोर्टात; टाइम्स नाऊ, रिपब्लिकवर बदनामीचा ठपका
नवी दिल्ली : बॉलीवूडमधील लोक अमली पदार्थांचे व्यसनी तसेच मलीन प्रतिमेचे आहेत, असा उल्लेख टाइम्स नाऊ, रिपब्लिक टीव्हीने सुशांतसिंह राजपूत प्रकरणी करून बेजबाबदार पद्धतीने वृत्तांकन केले, अशा तक्रारी करणारी याचिका आमीर खान, शाहरूख खान, सलमान खान, अजय देवगण आदी दिग्गज कलाकार व निर्माते, चित्रपट क्षेत्रातील विविध संघटनांनी केला आहे. दिल्ली उच्च न्यायालयात याचिका केली आहे.
या प्रकरणात दाद मागणाऱ्यांमध्ये करण जोहर, आदित्य चोप्रा, फरहान अख्तर आदी नामवंतांचाही समावेश आहे. रिपब्लिक टीव्हीचे अर्णब गोस्वामी, प्रदीप भंडारी तसेच टाइम्स नाऊचे राहुल शिवशंकर, नविकाकुमार यांच्या विरोधात न्यायालयात या कलाकारांनी दाद मागितली आहे. या वृत्तवाहिन्यांनी बॉलीवूडसाठी ओंगळ, व्यसनी अशा अपशब्दांचा वापर चालविलेला आहे, असा आरोप या याचिकेत आहे. बॉलीवूडमध्ये घाण असून ती साफ करण्याची गरज आहे, अशी प्रक्षोभक भाषा या वृत्तवाहिन्यांनी वापरल्याचा आरोप केला आहे. सुशांतप्रकरणी माध्यमांनी कायद्याचा भंग होईल, असे वृत्तांकन करू नये, असा आदेश द्यावा, अशी विनंती केलीे.