एमपीएससीच्या परीक्षेला बसविले बोगस उमेदवार; दुकली अटकेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2019 21:37 IST2019-06-18T21:33:08+5:302019-06-18T21:37:17+5:30
या प्रकरणाचा माटुंगा पोलीस अधिक तपास करत आहेत.

एमपीएससीच्या परीक्षेला बसविले बोगस उमेदवार; दुकली अटकेत
मुंबई - महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) लिपीक पदाच्या परिक्षेत बोगस उमेदवार बसवल्याप्रकरणी माटुंगा पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. अकलेश भाऊलाल नागलोत आणि मनोज तोटेवाड अशी या आरोपींची नावे आहेत. या प्रकरणाचा माटुंगा पोलीस अधिक तपास करत आहेत.
औरंगाबादचा रहिवाशी असलेल्या तोटेवाडने ११ जून २०१७ रोजी एमपीएससीची लिपीक पदाची परीक्षा दिली होती. माटुंगाच्या एका प्रसिद्ध शाळेत त्याला परिक्षा केंद्र आलं होतं. या परिक्षेत तोटेवाड अनुसुचित जाती जमाती वर्गातून ७ व्या क्रमांकाने उतीर्ण झाला होता. त्यानुसार तोटेवाडची मुख्य कार्यालयात नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, वस्तुस्थिती पाहता ज्या पदाची परिक्षा तोटेवाड पास झाला त्याचं त्याला थोडंही ज्ञान अवगत नव्हतं. त्यामुळे आयोगाने तोटेवाड याची चौकशी केली. या चौकशीत तोटेवाडने बोगस उमेदवार पाठवून ही परीक्षा उत्तीर्ण झाल्याचं उघडकीस आलं आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या लक्षात येऊ नये यासाठी तोटेवाडने परीक्षेला बसणाऱ्या सहआरोपी अकलेशचे स्वत:च्याच नावाने बनावट खातं बनवले होते. तसेच, सर्व कागदपत्रांवरील सहीही त्याने केली होती. इतर दस्तावेजाची देखील अशाप्रकारेच जुळवाजुळव केल्याचं निदर्शनास आल्यानंतर तोटेवाडचा पर्दाफाश झाला.
या प्रकरणी तोटेवाडला २६ नोव्हेंबर २०१८ रोजी निलंबित करत चौकशीचे आदेश दिले होते. चौकशीत तोटेवाड याचा गुन्ह्यातील सहभाग निश्चित होताच, त्याच्या विरोधात लोकसेवा आयोगाने १३ जून रोजी माटुंगा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला. त्यानंतर पोलिसांनी त्यालाअटक करण्यात आली. तोटेवाडच्या अटकेनंतर त्याच्याजागी बोगस बसलेल्या उमेदवाराचा पोलिसांनी शोध घेण्यास सुरूवात केली. त्यावेळी या गुन्ह्यात अकलेश भाऊलाल नागलोत याचा सहभाग असल्याचं निश्चित झाल्यानंतर पोलिसांनी त्याला देखील बेड्या ठोकल्या. अकलेशच्या पोलीस चौकशीत तो औरंगाबादच्या तहसील कार्यालयात पुरवठा निरीक्षक असल्याचे समोर आलं आहे.