रक्ताच्या थारोळ्यात घरात आढळला मृतदेह पत्नी अन् मुलगाही जखमी, घातपाताचा संशय
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2021 17:29 IST2021-12-12T17:29:02+5:302021-12-12T17:29:29+5:30
कौटुंबिक वादातून ही घटना घडली असावी असा प्राथमिक अंदाज असून घातपाताचा देखील संशय व्यक्त केला जात आहे.

रक्ताच्या थारोळ्यात घरात आढळला मृतदेह पत्नी अन् मुलगाही जखमी, घातपाताचा संशय
कल्याण: सेवानिवृत्त मोटरमनचा मृतदेह रहात्या घरात रक्ताच्या थारोळ्यात आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. पत्नी आणि मुलगाही गंभीर जखमी झाले आहेत. ही धककादायक घटना पश्चिमेकडील चिकणघर परिसरातील निखिल हाईटस या हाय प्रोफाइल सोसायटीत घडली आहे. जखमींना उपचारासाठी खाजगी रूग्णालयात दाखल करण्यात आले असून महात्मा फुले चौक पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. कौटुंबिक वादातून ही घटना घडली असावी असा प्राथमिक अंदाज असून घातपाताचा देखील संशय व्यक्त केला जात आहे.
प्रमोद बनोरीया असे मृत व्यक्तीचे नाव आहे. सेवानिवृत्त मोटरमन असलेले प्रमोद हे पत्नी कुसुम आणि मुलगा लोकेश यांच्यासह निखिल हाईटस सोसायटी येथे चौथ्या मजल्यावर वास्तव्याला होते. रविवारी सकाळी लोकेशने सोसायटीच्या वॉचमनला फोन करून रूग्णवाहीका हवी असल्याचे सांगितले. संशय आल्याने वॉचमनने ही बाब सोसायटीतील अन्य रहिवाशांना सांगितली. त्यांनी बनोरीया यांच्या घरी जाऊन पाहिले असता त्यांना एकच धकका बसला. प्रमोद यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळयात पडला होता तर त्यांचा मुलगा लोकेश आणि पत्नी कुसुम जखमी अवस्थेत आढळून आले. घरात सर्वत्र रक्ताचा सडा पडला होता.
रहिवाशांनी तत्काळ याची माहीती महात्मा फुले चौक पोलिस ठाण्यात दिली. घटनास्थळी महात्मा फुले चौक पोलिस अधिकारी कर्मचा-यांसह पोलिस उपायुक्त सचिन गुंजाळ आणि सहाय्यक पोलिस आयुक्त उमेश माने-पाटील हे दाखल झाले. कौटुंबिक वादातून वडीलांनी आमच्यावर हल्ला केला आणि नंतर स्वत:वर चाकूने वार करून आपले जीवन संपविले अशी माहीती जखमी अवस्थेतील लोकेशने पोलिसांना दिली. दरम्यान पोलिसांनी गुन्हा दाखल करीत तपास सुरू केला असून ही घटना रात्रीच्या सुमारास घडली असावी असाही अंदाज मांडला जात आहे.
चौकशीअंती सत्य बाहेर येईल-
रक्ताच्या थारोळयात प्रमोदचा मृतदेह आढळून आला आहे. पत्नी आणि मुलगा हे दोघेही जखमी आहेत. जखमींवर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिस तपास सुरू आहे तपासाअंती या घटनेमागील सत्य समोर येईल- उमेश माने पाटील (सहाय्यक पोलीस, आयुक्त कल्याण विभाग)