बापाने नदीत फेकलेल्या 'त्या' मुलाचा मृतदेह आढळला
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2021 22:20 IST2021-10-02T22:18:55+5:302021-10-02T22:20:43+5:30
Crime News : सिकंदर मुल्ला याने स्वतःच्या ५ वर्षीय मुलाच्या औषधोपचाराचा खर्च परवडत नसल्याने त्याला गुरुवारी रात्री इचलकरंजीतील पंचगंगा नदीवरील मोठ्या पुलावरून नदीत फेकले होते.

बापाने नदीत फेकलेल्या 'त्या' मुलाचा मृतदेह आढळला
इचलकरंजी : कबनूर (ता हातकणंगले) येथील निर्दयी बापाने स्वतःच्या ५ वर्षीय मुलाला दोन दिवसांपूर्वी पंचगंगा नदीत टाकले होते. त्याचा मृतदेह शनिवारी कुरूंदवाड येथील कृष्णा नदी पात्रात मजरेवाडी जाकवेल जवळ सापडला. अफान मुल्ला असे त्या मुलाचे नाव आहे. याप्रकरणी सिकंदर मुल्ला (वय ४८) याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.
सिकंदर मुल्ला याने स्वतःच्या ५ वर्षीय मुलाच्या औषधोपचाराचा खर्च परवडत नसल्याने त्याला गुरुवारी रात्री इचलकरंजीतील पंचगंगा नदीवरील मोठ्या पुलावरून नदीत फेकले होते. गेल्या दोन दिवसांपासून त्याचा पंचगंगा नदीत शोध सुरू होता. अखेर शनिवारी त्याचा मृतदेह कुरुंदवाड येथे कृष्णा नदीत एका मासे पकडणाऱ्या अरुण नाईक या व्यक्तीला दिसला. त्याने पोलिसांना माहिती दिली.
कुरुंदवाड पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक बालाजी भांगे व उपनिरीक्षक अमित पाटील यांनी पंचनामा केला. याप्रकरणी इचलकरंजीतील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.