रोहकलमध्ये रक्तरंजीत थरार; एका महिलेसह दोघांचा खून
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2020 15:28 IST2020-06-21T15:28:36+5:302020-06-21T15:28:55+5:30
गाव हादरले : संशयित आरोपीचे घटनास्थळावरून पलयान

रोहकलमध्ये रक्तरंजीत थरार; एका महिलेसह दोघांचा खून
परंडा (जि. उस्मानाबाद) : जुन्या भांडणाची कुरापत काढून संतप्त झालेल्या एकाने महिलेसह दोघांची हत्या केली. ही थरारक घटना परंडा तालुक्यातील रोहकल येथे रविवारी घडली. घटनेनंतर संशयित व्यक्ती घटनास्थळावरून पसार झाला आहे.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, १९ जून रोजी जुन्या भांडणाची कुरापत काढून व गायरानाच्या वहिवाटीवरून संशयित समाधान रामा काळे याचा सुभाष काळे (वय ४५) यांच्याबरोबर वाद झाला. वादाचे पर्यावसण हाणामारीत झाले असता, सुभाष हे गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी उस्मानाबाद येथे दाखल करण्यात आले. उपचार सुरू असतानाच शनिवारी रात्री त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, सदरील वार्ता रोहकल येथे धडकताच संशयित समाधान काळे याने मयताची बहीण लाडकी निवांत्या शिंदे (वय ४०) यांच्यावर रविवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास सशस्त्राच्या सहाय्याने हल्ला करीत गळा चिरून हत्या केली. समाज मनाला हेलावून सोडणाºया या घटनेनंतर संशयित घटनास्थळावरून पसार झाला आहे. मयत लाडकी यांचे प्रेत उत्तरीय तपासणीसाठी अनाळा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यात आले आहे. दम्यान, माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धावत घेत तपास सुरू केला आहे.