चंद्रपुरात रेमडेसिविरचा काळाबाजार; डॉक्टररासह दोन परिचारिकांसह पाच जणांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2021 20:46 IST2021-05-08T20:45:54+5:302021-05-08T20:46:51+5:30
Blackmarket of remdesivir in Chandrapur : याप्रकरणी डॉक्टर व दोन परिचारिकांसह पाच जणांना अटक करण्यात आली आहे.

चंद्रपुरात रेमडेसिविरचा काळाबाजार; डॉक्टररासह दोन परिचारिकांसह पाच जणांना अटक
चंद्रपूर : कोविड रुग्णांवर उपचार करणाऱ्या क्राइस्ट हॉस्पिटलच्या मिशनरी विभागातील आयसीयूमधील डॉक्टर रेमडेसिविरचा काळाबाजार करून परिचारिकेच्या पती व मुलाच्या साहाय्याने २५ ते ३० हजार रुपयाला विकत असल्याची धक्कादायक बाब चंद्रपुरात उघडकीस आली. याप्रकरणी डॉक्टर व दोन परिचारिकांसह पाच जणांना अटक करण्यात आली आहे.
आरोपींमध्ये डॉ. जावेद हुसेन सिद्दिकी, आशय उराडे, प्रदीप गणवीर व दोन परिचारिकांचा समावेश आहे. शनिवारी पाचही जणांना न्यायालयात हजर केल्यानंतर त्यांची कारागृहात रवानगी केली आहे. शहरातील गांधी चौकात अन्न औषध प्रशासन विभागाचे निरीक्षक सी.के. डांगे यांनी गरजूंना २५ हजार रुपयांना रेमडेसिविर विकताना आशय उराडे, प्रदीप गणवीर याला ताब्यात घेतले होते. या प्रकरणाचा तपास शहर पोलीस स्टेशनकडे सोपविण्यात आला. या दोघांची सखोल चौकशी केल्यानंतर क्राइस्ट हॉस्पिटलमधून रेमडेसिविर मिळाल्याची माहिती मिळाली. त्यांनी लगेच क्राइस्ट हॉस्पिटलमधील डॉ. जावेद हुसेन सिद्दिकी याला ताब्यात घेतले. या काळा बाजारात परिचारिका सहभागी असल्याचे पुढे येताच त्यांनासुद्धा ताब्यात घेतले. एका परिचारिकेचा मुलगा व दुसऱ्या परिचारिकेचा पती यांच्या साहाय्याने २५ हजार रुपयांना रेमडेसिविर विकत असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे पाचही जणांवर भादंवि कलम ४२०, ३४ यासह जीवनावश्यक वस्तू अधिनियम, औषधी, द्रव्य व सौंदर्यप्रसाधने अधिनियम, आपत्ती व्यवस्थापन अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. शनिवारी त्यांना न्यायालयात हजर केल्यानंतर त्यांची कारागृहात रवानगी करण्यात आली. ही कारवाई शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुधाकर अंभोरे यांच्या नेतृत्वात शहर पोलीस स्टेशनमधील कर्मचाऱ्यांनी केली.