सेक्सच्या धंद्यातलं ब्लॅकमेलिंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2023 12:27 PM2023-10-22T12:27:04+5:302023-10-22T12:29:06+5:30

तुम्ही सेक्सटॉर्शनचे बळी आहात का?

blackmailing in the assaulting trade | सेक्सच्या धंद्यातलं ब्लॅकमेलिंग

सेक्सच्या धंद्यातलं ब्लॅकमेलिंग

उन्मेष जोशी, सहसंस्थापक, रिस्पॉन्सिबल नेटीझम 

सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून कुणाशी तरी मैत्री होते आणि मैत्री झाल्यावर नंबर शेअर केले जातात. मग त्या नंबरवरून एक दिवस अचानक व्हिडीओ कॉल येतो. समोर कुणीतरी मुलगा किंवा मुलगी असते. ते कपडे काढायला लागतात किंवा अचानकपणे विवस्त्र रूपातच तुमच्या समोर येतात. तुम्हाला कळतं काहीतरी गडबड आहे म्हणून तुम्ही कॉल बंद करता पण तोपर्यंत स्क्रीन रेकॉर्डिंग झालेलं असतं. लगेचच पुढचा फोन येतो आणि ‘पैसे द्या नाहीतर आम्ही हा व्हिडीओ व्हायरल करू’ असं ब्लॅकमेल करायला सुरुवात होते. 

फेसबुक किंवा इन्स्टाग्रामवरचे तुमचे फॉलोअर्स कोण आहेत हे तर सगळ्यांना कळतं. त्यामुळे धमकी देणारे त्या माहितीचा आधार घेऊन तुम्हाला धमकी देऊ लागतात. तुमच्या सगळ्या नातेवाईक-मित्रमंडळींपर्यंत हे पोहोचवू, असं सांगितलं जातं आणि तुम्हाला त्रास द्यायला सुरुवात होते. हे प्रकार थांबतच नाहीत. तुम्ही पैसे देत राहता आणि तुम्हाला ब्लॅकमेल करणं सुरूच राहतं. काही हजार रुपये दिल्यावर हे प्रकरण थांबेल असं काहींना वाटतं, पण तसं होत नाही. धमकी द्यायची, पैसे उकळायचे हे चालूच राहतं. यालाच सेक्सटॉर्शन म्हणतात.

हे लक्षात ठेवा 

अनोळखी व्हिडीओ कॉल घेऊ नका. अनोळखी लोकांशी इंटरनेटवर मैत्री झाली, तरी तुमची खासगी व गोपनीय माहिती, फोन नंबर, लोकेशन देऊ नका. दुर्दैवाने तुम्ही अशा गुन्ह्यांना बळी पडलात, तर लगेचच cybercrime.gov.in वर तक्रार करा. येथे तक्रार नोंदविताना तुमचा फोटो किंवा व्हिडीओ तुम्हाला त्यांच्याबरोबर शेअर करण्याची गरज नसते. निर्भयपणे पुढे येऊन सांगा की, ‘माझ्या बाबतीत असा प्रकार झाला असून जर तुम्हाला माझे असे व्हिडीओ कुणी पाठवले तर त्याकडे दुर्लक्ष करा.’

व्हिडीओ शेअर करण्याची धमकी

सेक्सटॉर्शन हे एक गुन्हेगारी कृत्य आहे. ज्यात एखाद्याला लैंगिक विषयक छायाचित्र, व्हिडीओ किंवा त्या व्यक्तीबद्दलची वैयक्तिक माहिती इंटरनेटवर उघड करण्याची/व्हायरल करण्याची धमकी देऊन ब्लॅकमेल केलं जातं. ब्लॅकमेल करणारा पीडित व्यक्तीचे लैंगिक फोटो किंवा व्हिडीओ इतरांबरोबर शेअर करण्याची धमकी देतो.

ब्लॅकमेल करणाऱ्याला अशी मिळते ‘ती’ सामग्री 

डेटिंग स्कॅमसह पीडित व्यक्तीला लक्ष्य करणे सोशल मीडियावरून ट्रोल करणे, डिव्हाइस हॅक करणे इत्यादी सेक्सटॉर्शनला बळी पडणाऱ्या व्यक्तींना भय, एकाकीपणा, लाज, चिंता आणि हताशपणा, हतबलता, मानसिक त्रास आणि धमक्या अशा अनेक परिणामांना सामोरे जावे लागू शकते.

तुम्ही सेक्सटॉर्शनचे बळी आहात का?

१ ई-मेल, व्हॉटसॲप मेसेज डिलीट करा 
२ ई-मेल, मेसेज ब्लॉक करा
३ समाजमाध्यमांकडे रिपोर्ट करा 
४ www.cybercrime.gov.in वर रिपोर्ट करा 
५ प्रतिसाद देऊ नका

लैंगिक शोषणाचा पीडितांवर घातक परिणाम होऊ शकतो. ऑनलाइन गुन्हेगार तुमचा विश्वास संपादन करण्यासाठी कुठलेही कारण सांगू शकतात हे लक्षात ठेवा व सजग राहा.

 

Web Title: blackmailing in the assaulting trade

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.