भाजपाच्या नगरसेवकाचा प्रताप; फोडलं महिलेचं डोकं
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2018 19:56 IST2018-10-26T19:51:11+5:302018-10-26T19:56:27+5:30
भार्इंदर पश्चिमेच्या गणेश देवल नगरमध्ये दयाशंकर रामलखन पांडे (वय ५१) हे कुटुंबासह राहतात. रंगारी काम करणाऱ्या पांडे यांनी मीरा रोडच्या कनकिया भागातील मिश्रा नावाच्या इसमाच्या घराचे रंगरंगोटीचे काम घेतले होते.

भाजपाच्या नगरसेवकाचा प्रताप; फोडलं महिलेचं डोकं
मीरारोड - रंगारीचे काम करणाऱ्यास आणि त्याच्या पत्नीला डोक्यावर लाकडी फळी मारुन डोके फोडल्याप्रकरणी भाजपा नगरसेवकासह त्याच्या अन्य दोन सहकाऱ्यांविरोधात भार्इंदर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भार्इंदर पश्चिमेच्या गणेश देवल नगरमध्ये दयाशंकर रामलखन पांडे (वय ५१) हे कुटुंबासह राहतात. रंगारी काम करणाऱ्या पांडे यांनी मीरा रोडच्या कनकिया भागातील मिश्रा नावाच्या इसमाच्या घराचे रंगरंगोटीचे काम घेतले होते. परंतु, मिश्रा यांनी काम वाढवल्याने पांडे यांनी काम सोडून दिले. त्यामुळे मिश्रा हे गणेश देवल नगरचे स्थानिक भाजपा नगरसेवक अशोक तिवारी यांना घेऊन गुरुवारी पांडे यांच्याकडे आले. दोघांमध्ये समझोता झाला. परंतु गुरुवारी रात्री अशोक तिवारी हे दिलीप सिंग, लाल सिंग यांच्यासोबत पांडेंच्या घरी आले. मला शिव्या का दिल्या? असा जाब विचारत तिवारी यांनी पांडेला मारहाण सुरु केली.
पांडे यांची पत्नी सरिता (वय ४५) या पतीला वाचवण्यास मध्यस्थी करत असता तिवारी यांनी तीच्या डोक्यात लाकडी फळी मारल्याने सरिताचे डोके फुटले. याप्रकरणी अशोक तिवारीसह अन्य दोन साथीदारांविरोधात भार्इंदर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. भाजपा नगरसेवक दौलत गजरे व कुटुंबाने अपशब्द वापरत एका दिवंगत पोलीसाच्या मुलीला मारहाण केल्याची घटना ताजी असतानाच आता तिवारी यांनी महिलेचे डोके फोडल्याच्या घटनेने राजकिय पक्ष व सामाजिक संस्थांकडून टिकेची झोड उठली आहे.