उत्तर प्रदेशातील बिजनौरमध्ये ट्रक चालकावर हल्ला केल्यानंतर पळून जाणाऱ्या काही गुन्हेगारांना पकडण्यासाठी कॉन्स्टेबलने कालव्यात उडी मारली. मात्र तेव्हाच विजेची तार अंगावर पडल्याने शॉक लागून त्यांचा मृत्यू झाला. शनिवारी एका पोलीस अधिकाऱ्यांनी याबाबत माहिती दिली. आरोपींची कार खांबाला धडकली आणि कालव्यात पडली. त्यांना पकडण्यासाठी दोन्ही कॉन्स्टेबलनेही कालव्यात उडी मारली, पण त्याचवेळी खांबावरून विजेची तार तुटून कालव्यात पडली.
पोलीस अधीक्षक अभिषेक यांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री नगीना रोडवरील गढी चौकात कारमधून प्रवास करणारे काही गुन्हेगार ट्रक चालकाला मारहाण करत होते. माहिती मिळताच पोलीस रिस्पॉन्स व्हेईकल (पीआरव्ही) चे कॉन्स्टेबल मनोज आणि गंगा राम घटनास्थळी पोहोचले. तेव्हा गुन्हेगारांनी गोळीबार सुरू केला आणि कारमधून पळून गेले.
पळून जाताना त्यांची कार सलामाबाद-भरैराजवळ नियंत्रणाबाहेर गेली. विजेच्या खांबाला धडकली आणि कालव्यात पडली. त्यानंतर दोन पोलीस कॉन्स्टेबलनेही त्यांना पकडण्यासाठी पटकन कालव्यात उडी मारली. याच दरम्यान कारने धडक दिलेल्या खांबावरची विजेची तार तुटून कालव्याच्या पाण्यात पडली, ज्यामुळे कालव्यात विद्युत प्रवाह निर्माण झाला.
घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी वीजपुरवाठा खंडित केला आणि दोन्ही कॉन्स्टेबलना पाण्याबाहेर काढलं. उपचारासाठी तातडीने रुग्णालयात नेलं. जिथे कॉन्स्टेबल मनोज यांना मृत घोषित करण्यात आलं, तर कॉन्स्टेबल गंगा राम यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. पोलिसांनी घटनास्थळावरून बिजनौर जिल्ह्यातील चांदपूर पोलीस स्टेशन परिसरातील झाल गावातील रहिवासी नीरज नावाच्या एकाला पकडलं आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नीरजचे दोन साथीदार पळून जाण्यात यशस्वी झाले आणि त्यांच्या शोधासाठी अनेक पथकं तयार करण्यात आली आहेत. तसेच अटक केलेल्या गुन्हेगाराची चौकशी सुरू आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.