Bihar News: बिहारची राजधानी पाटणा भाजप नेत्याच्या हत्येने हादरली. पाटणामध्ये भारतीय जनता पक्षाचे नेते सुरेंद्र केवट यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. दुचाकीवरून आलेल्या दोन तरुणांनी सुरेंद्र केवट यांच्यावर गोळीबार केला. त्यांना चार गोळ्या लागल्या होत्या. गेल्या काही दिवसात बिहारमधील दुसरी खळबळजनक घटना आहे. काही दिवसांपूर्वी व्यावसायिक गोपाल खेमका यांची हत्या करण्यात आली होती.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
विधानसभा निवडणुकीचे वारे वाहण्यास सुरूवात झालेल्या बिहारमध्ये कायदा आणि सुव्यव्यस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. गोपाल खेमका यांच्या हत्येची घटना चर्चेत असतानाच पाटणामध्ये भाजप नेते सुरेंद्र केवट यांची हत्या करण्यात आली आहे.
जखमी अवस्थेत नेण्यात आले रुग्णालयात
सुरेंद्र केवट हे भाजप किसान मोर्चाचे पुनपुन विभागाचे अध्यक्ष होते. दुचाकीवरून आलेल्या दोन तरुणांनी त्यांच्यावर गोळीबार केला. यात ते जखमी झाले. त्यांना चार गोळ्या लागल्या होत्या. सुरेंद्र केवट यांना तातडीने पाटणातील एम्स रुग्णालयात नेण्यात आले.
उपचार सुरू असतानाच सुरेंद्र केवट यांचा मृत्यू झाला. केवट यांच्यावर गोळीबार करण्यात आल्याची माहिती मिळताच फुलवारीशरीफचे आमदार गोपाल रविदास आणि माजी मंत्री शाम रजक यांनी रुग्णालयात धाव घेतली. तिथे त्यांना केवट यांचा मृत्यू झाल्याचे कळले. दोन्ही नेत्यांनी केवट यांच्या कुटुंबाचे सांत्वन करत धीर दिला.
पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू
घटनेची माहिती मिळताच पीपरा पोलीस ठाण्याचे प्रमुख आणि मसौदीचे उपायुक्त कन्हैया प्रसाद सिंह यांनी गोळीबार झालेल्या ठिकाणाला भेट दिली आणि पाहणी केली. पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला आहे. आरोपींना लवकरच अटक करण्यात येईल, अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.
तेजस्वी यादव यांचा भाजपवर हल्ला
सुरेंद्र केवट यांच्या हत्येनंतर विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांनी मुख्यमंत्री नितीश कुमार आणि भाजपच्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांवर घणाघाती हल्ला चढवला.
"आणि आता पाटण्यामध्ये भाजप नेत्याची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. काय बोलायचं, कोणाला बोलायचं? एनडीए सरकारमध्ये सत्य ऐकणारा कोणीही नाहीये. चूक मान्य करणारा नाही? मुख्यमंत्र्यांच्या (नितीश कुमार) प्रकृतीबद्दल सगळ्यांना माहिती आहे, पण भाजपचे दोन-दोन निष्क्रिय उपमुख्यमंत्री काय करत आहेत? भ्रष्ट पक्षाचे अजूनही कोणतीही प्रतिक्रिया नाही", अशा शब्दात तेजस्वी यादव यांनी भाजपवर टीकास्त्र डागले.
काही दिवसांपूर्वीच बिहारमध्ये नामांकित व्यावसायिक गोपाल खेमका यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. गोपाल खेमका यांच्यावर त्यांच्या घराबाहेरच गोळ्या झाडण्यात आल्या. सीतामढी, गया, नवादा, बेगुसराय आणि मुजफ्फरपूरमध्येही गोळ्या घालून हत्या करण्यात आल्याच्या घटना गेल्या काही दिवसात घडल्या आहेत. त्यामुळे बिहारमधील गुन्हेगारीचा मुद्दा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे.