आलिशान घर, राईस मिल, पेट्रोल पंप... अधिकाऱ्याकडे सापडलं ४० लाखांसह कोट्यवधींचं घबाड
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2025 12:32 IST2025-12-13T12:31:53+5:302025-12-13T12:32:37+5:30
राज्य सरकारच्या आर्थिक गुन्हे युनिट (EOU) ने शुक्रवारी एक मोठी कारवाई केली.

फोटो - tv9hindi
बिहारमध्ये सध्या सर्वच तपास यंत्रणा कारवाई करताना दिसत आहेत. राज्य सरकारच्या आर्थिक गुन्हे युनिट (EOU) ने शुक्रवारी एक मोठी कारवाई केली. EOU ने आर्थिक गुन्ह्यांवर लक्ष केंद्रित करत पाटलीपुत्र सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँकेचे विकास अधिकारी भावेश कुमार सिंह यांच्या सहा ठिकाणांवर एकाच वेळी छापे टाकले. आतापर्यंतच्या छाप्यांमध्ये जे काही समोर आलं आहे, ते पाहून सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. राईस मिलमधून ४० लाख रुपये रोख रक्कम मिळाल्याची माहिती समोर आली आहे.
EOU ने भावेश कुमार सिंह यांच्या रूपसपूरच्या राम जयपाल नगर येथील पुष्पक रेसिडेन्सी अपार्टमेंटमधील फ्लॅट क्रमांक २०३, जकरियापूर मोहल्ल्यातील घर, गोपालगंज जिल्ह्यातील माझागढ पोलीस स्टेशन अंतर्गत जलालपूर गावातील वडिलोपार्जित घर, गोपालगंजमधील माझागढ येथील भावना पेट्रोलियम आणि पटनातील बेला बिहटा येथे असलेल्या जय माता दी राईस मिल तसेच पाटलीपुत्र सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, एसपी वर्मा रोड येथील कार्यालयात हे छापे टाकले.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, EOU च्या पथकाला छापेमारी दरम्यान आलिशान फ्लॅट-घरं, पेट्रोल पंपशी संबंधित कागदपत्रं आणि डिजिटल रेकॉर्ड मिळाले आहेत. आता हे पथक भावेश कुमार सिंह यांच्या उत्पन्नापेक्षा अधिक असलेल्या मालमत्तेशी संबंधित अनेक नवीन तथ्य शोधत आहे. EOU ने दिलेल्या माहितीनुसार, कोर्टाकडून वॉरंट मिळाल्यानंतर भावेश कुमार सिंह यांच्या ठिकाणांवर छापेमारीची कारवाई सुरू करण्यात आली. त्यांच्यावर आपल्या उत्पन्नापेक्षा ६०.६८% जास्त मालमत्ता जमा केल्याचा आरोप आहे.
EOU कडून हे देखील स्पष्ट करण्यात आलं आहे की, ही कारवाई सध्या प्राथमिक टप्प्यात आहे. पथकाला अनेक महत्त्वाची कागदपत्रं मिळाली आहेत. डिजिटल डेटाची फॉरेन्सिक तपासणीही केली जाणार असल्याचं सांगितले जात आहे. छापेमारी संपल्यानंतर एक सविस्तर अहवाल जारी केला जाऊ शकतो. या संपूर्ण प्रकरणात आर्थिक गुन्हे पोलीस स्टेशनमध्ये भावेश कुमार सिंह यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.