Crime News: JDU नेत्याच्या नातवाची भररस्त्यात गोळ्या घालून हत्या, आरोपी पसार...
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2022 12:21 IST2022-03-16T12:21:13+5:302022-03-16T12:21:24+5:30
Crime News: दरोडा टाकण्यासाठी आलेल्या दरोडेखोरांनी तरुणावर गोळीबार केला, यात त्याचा जागीच मृत्यू झाला.

Crime News: JDU नेत्याच्या नातवाची भररस्त्यात गोळ्या घालून हत्या, आरोपी पसार...
छपरा: बिहारच्या छपरामधून मोठी बातमी समोर आली आहे. दरोडा टाकण्यासाठी आलेल्या दरोडेखोरांनी एका तरुणाची गोळ्या घालून हत्या केली आहे. दीपक कुमार असे मृताचे नाव असून, तो जेडीयूचे (Janta Dal United) ज्येष्ठ नेते आणि माजी जिल्हा परिषद अध्यक्ष वैजनाथ प्रसाद बिकल यांचा नातू होता.
सविस्तर माहिती अशी की, दीपक कुमार शिक्षणासाठी पाटण्यात राहत होता. घटनेच्या दिवशी तो त्याच्या बहिणीसोबत बाईकवरुन आपल्या गावी येत होता. यादरम्यान, रामपूर बथानीजवळ आरोपींनी त्याच्या दुचाकी ओव्हरटेक केले आणि त्याची दुचाकी थांबवली. आरोपींनी बहिणीच्या गळ्यातील सोन्याची साखळी आणि दागिने लुटण्याचा प्रयत्न केला.
यावेळी दीपकने दरोड्याच्या घटनेला विरोध केल्याने आरोपींनी दीपकवर गोळ्या झाडल्या आणि दरोडा टाकून पळ काढला. गोळी लागल्याने दीपकचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर संतप्त लोकांनी रास्ता रोको केला आहे. या प्रकरणाची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला आणि आरोपींचा शोध सुरू केला आहे.