मुंबई - पुणे येथील एमटी विभागात डीआयजी पदावर होते असलेले डीआयजी निशिकांत मोरे यांचे अखेर गुहा विभागाने निलंबन केले आहे. विनयभंगाचा आरोप असणारे डीआयजी निशिकांत मोरे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज आजच फेटाळण्यात आल्यानंतर गृह विभागाने ही मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणात पीडित अल्पवयीन मुलीने विनयभंगाचा आरोप केल्याने तळोजा पोलीस ठाण्यात पॉक्सोचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. दोन दिवसांपूर्वी घरात चिठ्ठी लिहून बेपत्ता झालेली पीडित मुलगी अजून सापडली नाही. याप्रकरणी देखील मुलगी हरवल्याची तक्रार तळोजा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. आज मोरे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे. त्यानंतर राज्याच्या पोलीस महासंचालकांनीही तात्काळ निलंबनाची कारवाई केली.
निशिकांत मोरे यांच्याविरुद्ध तळोजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून हे प्रकरण अन्वेषणाधीन आहे. तसेच मोरे यांच्याविरुद्ध पोलीस महासंचालक यांनी शासनास सादर केलेल्या अहवालाच्या अनुषंगाने त्यांच्याविरुद्ध शिस्तभंगविषयक कार्यवाही करण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. त्याअनुषंगाने आज गृह विभागामार्फत शासन आदेश निर्गमित करुन मोरे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली असल्याचे गृह मंत्री देशमुख यांनी सांगितले.
पॉक्सोप्रकरणी पोलीस अधिकाऱ्याच्या अडचणीत वाढ; अटकपूर्व जामीन कोर्टाने फेटाळला
परिचित अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याचा मोरेंवर आरोप करण्यात आला आहे. मोरे यांच्याविरोधात तक्रार करण्यासाठी तळोजा आणि खारघर पोलीस ठाण्यात गेल्यावर तक्रार दाखल करून घेतली नसल्याने मुलीच्या कुटुंबीयांनी अलीकडेच खारघरमध्ये पत्रकार परिषद घेतली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन निवेदन देणार असल्याचे यावेळी मुलींना वडिलांनी सांगितले होते. तळोजा वसाहतीत वास्तव्यास असलेले, विकासक असलेले पीडित मुलीचे वडील आणि डीआयजी निशिकांत मोरे यांची आठ वर्षांपूर्वी खारघरमध्ये ओळख झाली होती. मोरे यांनी त्यांच्याकडून दुकान गाळे विकत घेतले होते. काही पैसे रोख देऊन गाळ्याचा ताबा घेऊन उर्वरित पैसे देण्यास टाळाटाळ करीत असल्याचा आरोप तक्रारदाराने ऑगस्ट महिन्यात पोलिसांकडे लेखी स्वरूपात केला होता. दरम्यान, जून महिन्यात १७ वर्षांच्या मुलीच्या वाढदिवसाच्या दिवशी निमंत्रण नसतानाही मोरे घरी आले. केप कापून मुलीच्या गालावर आणि शरीरावर केक लावून अश्लील वर्तन केल्याचा आरोप मुलीच्या कुटुंबियांनी केला. याप्रकरणी गुन्हा दाखल केल्याचे तळोजा पोलिसांनी सांगितले होते. मात्र, दरम्यान अटक टाळण्यासाठी मोरे यांनी न्यायालयात धाव घेत अटकपूर्व जामिनाचा अर्ज दाखल केला होता.